महावितरणने शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे
By Admin | Updated: November 13, 2014 23:10 IST2014-11-13T23:10:44+5:302014-11-13T23:10:44+5:30
निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नाबाबत खासदार भावना गवळी यांनी महावितरण कंपनीचे प्रबंध संचालक अजय मेहता यांची भेट घेऊन यवतमाळ

महावितरणने शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे
यवतमाळ : निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नाबाबत खासदार भावना गवळी यांनी महावितरण कंपनीचे प्रबंध संचालक अजय मेहता यांची भेट घेऊन यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.
यावेळी महावितरणचे संचालक देशपांडे हे सुद्धा उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी राज्यात यवतमाळ व वाशिम हे दोन जिल्हे अग्रस्थानी आहेत. या आत्महत्या थांबवायच्या असतील तर महावितरणकडे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रतिक्षा यादी निकाली काढावी व शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्यावी अशी मागणी खासदारांनी केली. कृषीपंपाची योग्य वेळेस विद्युत जोडणी करावयास पाहिजे. शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून विद्युत विभागाकडून जोडण्यास देण्यात येत नसल्यामुळे आता त्यांना आपले पीक वाचविणे अवघड झाल्याचे त्या म्हणाल्या.
यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अनेक महिन्यांपासून रोहित्र नाहीत, बऱ्याच गावांमध्ये ६३ किलो व्हॅट अॅम्पीअर क्षमतेचे रोहित्र बसविले जातात. परंतु तेथे १०० केव्हीची आवश्यकता असते. त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रकार वारंवार घडता. परिणामी विद्युत पुरवठा एक ते दोन महिने खंडीत होतो. यामध्ये महावितरणचेही नुकसान होते. तसेच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते.
हे दुहेरी नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावात आवश्यकतेनुसार योग्य क्षमतेचे रोहित्र बसविण्यात यावे असे खासदार गवळी यांनी सुचविले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी वीज कनेक्शन जोडणी उशिरा मिळणे, वारंवार रोहित्र जळने, विद्युत पुरवठा खंडीत होणे ही कारणे मोठ्या प्रमाणात आहेत. कृषीपंपांची प्रतिक्षा यादी संपविण्यासाठी महावितरणने कालबाह्य कार्यक्रम आखून सहा महिन्यात ती निकाली काढावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वीज वितरण कंपनीने प्लार्इंग स्कॉड प्रमाणे टास्क फोर्स स्कॉडची निर्मिती करावी. ज्या व्दारा हे स्कॉड शेतकऱ्यांच्या समस्यांचे वेळेत निरसन करतील. कोणत्या गावाला किती पॉवरचे ट्रान्सफार्मर लागेल, शेतकऱ्यांना लागणारे वीजेचे नियोजन व शेतकऱ्यांच्या विजेशी निगडीत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातून उपाय योजना करतील. याचा शेतकरी आत्महत्यांवर आळा बसेल. सोबतच प्रलंबित असलेले १३२ केव्ही सबस्टेशनची कामे लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांनी सुचविले. यावेळी महावितरणचे प्रबंध संचालक अजय मेहता यांनी खासदार गवळी यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेऊन यासंदर्भात त्वरित अंमलबजावणीचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)