यवतमाळ जिल्हा बँकेत महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 13:46 IST2020-12-22T13:46:09+5:302020-12-22T13:46:30+5:30
Yawatmal news जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंगळवारी मतमोजणीचे निकाल हाती येत असून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे.

यवतमाळ जिल्हा बँकेत महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंगळवारी मतमोजणीचे निकाल हाती येत असून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत तालुका गटाच्या ११ जागा राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. यातील पुसद व उमरखेडची जागा बिनविरोध आहे. जिल्हा गटातही दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपच्या नेतृत्त्वातील शेतकरी सहकार विकास आघाडीला तालुका गटाच्या केवळ दोन जागा मिळाल्या असून जिल्हा गटाच्या तीन जागांवर पहिल्या फेरीत त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. जिल्हा गटाच्या आणखी तीन फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. आतापर्यंत घोषित विजयी उमेदवारांमध्ये बहुतांश जुनेच चेहरे दिसत आहेत. नव्याने निवडून आलेल्यांमध्ये वणीचे टिकाराम कोंगरे, मारेगावचे संजय देरकर, झरीचे राजू येल्टीवार, घाटंजीचे आशीष लोणकर, राळेगावच्या वर्षा तेलंगे, पुसदचे अनुकूल चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सर्वाधिक काट्याची लढत असलेल्या नेर, दारव्हा येथील अंतिम निकाल जारी होण्याची प्रतीक्षा आहे. पांढरकवडा येथील तालुका गटात विद्यमान संचालक प्रकाश मानकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
सोमवारी संचालकांच्या २१ पैकी १९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वाजतापासून दारव्हा रोड स्थित गुरुदेव मंगल कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. मतदानादरम्यान पांढरकवडा व दिग्रस येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दुपारी ३ पर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष विनायक एकरे, माजी उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.