महात्मा फुलेंचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:10+5:30
‘महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन’ या विषयावर डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, दक्षिण अफ्रिकेतील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील मजकूर आज जगात गाजतो आहे. एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल तर त्या देशावर अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्र डागण्याची आवश्यकता नाही. त्या देशातील शिक्षण व्यवस्था खालावली की तो देश आपोआप नष्ट होतो.

महात्मा फुलेंचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : समाजक्रांतीचे अग्रणी महात्मा फुलेंचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अपूर्व आहे. स्त्रिया आणि उपेक्षित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाला महत्त्व दिले. स्वत:च्या कष्टातून शाळा स्थापन केल्या. मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे जाणून त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले. त्यामुळे भारतात शिक्षक दिन म्हणून महात्मा फुले यांची जन्मतिथी वा पुण्यतिथीच योग्य आहे, असे प्रतिपादन सत्यशोधक विचारवंत प्रा.डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी केले.
येथील आझाद मैदानात महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृतिपर्व आयोजित करण्यात आले. यात गुरुवारी माळी समाजाच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सत्यशोधक स्टडी सर्कलचे अध्यक्ष प्रा.दीपक वाघ अध्यक्षस्थानी होते.
‘महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन’ या विषयावर डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, दक्षिण अफ्रिकेतील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील मजकूर आज जगात गाजतो आहे. एखाद्या देशाला नष्ट करायचे असेल तर त्या देशावर अणुबॉम्ब किंवा क्षेपणास्त्र डागण्याची आवश्यकता नाही. त्या देशातील शिक्षण व्यवस्था खालावली की तो देश आपोआप नष्ट होतो. आपली आजची शिक्षण व्यवस्था ही अशीच आहे.
आदर्श शिक्षक निवडताना त्याचे चारित्र्य तपासले जाते. हा निकष राधाकृष्णन यांना लावला गेला नाही. आपला जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा, अशी स्वत: राधाकृष्णन यांची इच्छा होती. म्हणूनच एकाच दिवशी मागणी, प्रस्ताव आणि मंजुरी मिळून ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन आमच्यावर लादण्यात आला आहे. जातीव्यवस्था निसर्गनिर्मित आहे, असे त्यांचे तत्त्वज्ञान पोकळ होते. म्हणूनच शिक्षणात खऱ्या अर्थाने योगदान देणाºया महात्मा फुलेंचा सन्मान झाला पाहिजे, असे डॉ.गायकवाड यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन अमर तांडेकर, कल्पना लंगडे यांनी केले. प्रास्ताविक सविता हजारे यांनी, तर आभार मोहन लोखंडे यांनी आभार मानले.
आज तेली महासंघ व जमात-ए-इस्लामी हिंदचे संयोजन
स्मृती पर्वात शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता तेली समाज महासंघाच्या संयोजनात व्याख्यान होणार आहे. ‘परिवर्तनाची विचारधारा स्वीकारून सामाजिक, आर्थिक व राजकीय उत्थान : आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान होईल. संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपक शिरभाते अध्यक्षस्थानी राहतील, तर संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल यांचे बीजभाषण होईल. याच दिवशी रात्री ८.३० वाजता जमात-ए-इस्लामी (हिंद) यवतमाळ यांच्या संयोजनात ‘भारत के बहुजन समाज की चुनौतियाँ और समाधान’ या विषयावर वाजीत कादरी यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संयोजकांतर्फे करण्यात आली आहे.