Maharashtra Election 2019 ; अनुकूल परिस्थितीतही उईकेंना कमी मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:12+5:30

के.एस. वर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वच स्तरावर ...

Maharashtra Election 2019 ; Low voting strength for favorable conditions | Maharashtra Election 2019 ; अनुकूल परिस्थितीतही उईकेंना कमी मताधिक्य

Maharashtra Election 2019 ; अनुकूल परिस्थितीतही उईकेंना कमी मताधिक्य

ठळक मुद्देनिकालानंतरची चर्चा : महाजनादेश यात्रा, कोट्यवधींची कामे तरीही...

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वच स्तरावर खरंच ‘आॅल इज वेल’ विषयी प्रश्नचिन्ह लागले आहे. प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना मिळालेल्या अतिशय कमी मताधिक्याने या प्रश्नाला जन्म दिला आहे. अनेक बाबी अनुकूल असतानाही गत निवडणुकीपेक्षा त्यांच्या मतांची आघाडी ३० हजाराने कमी झाली.
राज्यात फडणवीस सरकारची कामगिरी, स्वत: आमदार म्हणून प्रा. उईके यांची कामगिरी आणि आदिवासी विकासमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वत:हून केलेल्या आपल्या प्रतिमेत, व्यवहारात, वागण्यात केलेला बदल, मुख्यमंत्र्यांची या मतदारसंघात आलेली महाजनादेश यात्रा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निघालेली मोठी रॅली आदी बाबी अनुकूल असतानाही अशोक उईके यांना मिळालेले कमी मताधिक्य हीच चर्चा निकालानंतर सर्वत्र सुरू झाली.
वास्तविक राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रथमच ना. उईके यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटींची विकास कामे झाली आहेत. पहिली आदिवासी सूतगिरणीस मंजुरात आणून देवधरी येथे भूमिपूजनही करण्यात आले. याशिवाय कर्जमाफी, घरकूल, शौचालय, शेततळे आदींमध्ये अनेकांना शासकीय योजनांचा लाभ दिला गेला. मतदारसंघात येत असलेल्या राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि पांढरकवडा तालुक्याच्या काही भागांसाठी वॉटरकप स्पर्धा सलग दोन-दोन, तीन-तीन वर्षे झाल्या तरी गतवेळी मिळालेली एक लाख मते यावेळी ९० हजारांपर्यंत घटली. ३८ हजारांवरून नऊ हजारांवर आले, असे का घडले हे भाजपच्या स्थानिक व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शोधून त्यानुसार आता बदल करण्याची गरज आहे.
वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांना गेली १४ महिन्यांपासून या मतदारसंघात भाजपच्या एका गटाने प्रोजेक्ट केले होते. येथे स्टँडींग उमेदवार उईके असताना मडावी यांना तिकीट मिळणार नव्हतेच. पण, मडावी यांना समोर करून पक्षात दुसरा गट अ‍ॅक्टीव करण्यात आला होता. पक्ष हायकमांडने मडावी आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना नोटीस देण्यापलीकडे कधी काही केले नाही. याच गटाने राळेगाव नगरपंचायतमध्ये वेगळी चूल मांडलेल्या गटास लिफ्ट दिली. नगरपंचायतमध्ये माजलेल्या अनागोंदीचा, असंतुष्ट गटाच्या कारवायांचा फटका उईकेंना थोडाफार बसलाच.
भाजप जिल्हाध्यक्ष पदावरून ऐन निवडणुकीच्या काळात राजेंद्र डांगे यांना दूर करण्यात आले. त्यांना राळेगाव मतदारसंघाची निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. येथील जिल्हा भाजप सरचिटणीस अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण यांना वणीची जबाबदारी दिली. यातून वेगळेच संदेश गेले. निवडणूक प्रचार काळात भाजपचे बाभूळगावचे नेते यवतमाळला ठाण मांडून होते. राजकारणात डावपेच, कूटनीती, आॅल राऊंडपणा आदीला अत्यंत महत्त्व आहे. भाजपमध्ये नेमक्या याच गोष्टीचा अभाव होता. त्याचे प्रत्यंतर निवडणूक प्रचार काळात आले. तरंगत्या मतदारांना आकृष्ट करण्याकरिता या काळात एकाही स्टार प्रचारकाची सभा झाली नाही, यातून हे स्पष्ट होते. तथापि काही बाबी अनुकूल असताना प्रा.डॉ. अशोक उईके यांना मिळालेली कमी मतांची आघाडी चिंतनीय आहे.

निवडणुकीचे राजकारण
निवडणूक विधानसभेची होती. पण यात अनेकांचे कालचे, आजचे व भविष्याचे राजकारण दडलेले होते. त्यामुळे अनेकजण आपापल्या भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे उघड किंवा छुपा पाठिंबा देऊन पाऊले टाकत होते. अनेक मान्यवर विविध बँकेच्या लहान-मोठ्या पदावर आहे. अनेकजण सहकारात पदाधिकारी आहे. त्यातील काहीजण नावाला गावचे, तर प्रत्यक्षात ‘यवतमाळ’चे आहेत. त्यातील प्रत्येकाने आपल्या ‘हिता’च्या दृष्टीने या निवडणुकीत भूमिका बजावली. काहींची भूमिका दुटप्पी होती.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Low voting strength for favorable conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.