Maharashtra Election 2019 ; शक्तिप्रदर्शनानंतर थंडावल्या प्रचार तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:07+5:30

जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येकच उमेदवाराने शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन केले होते. विशेष करून यवतमाळ शहरात बाईक रॅली व हातात ध्वज घेऊन नारे देत दुचाकीस्वार गल्लोगल्ली दिसत होते. खुल्या जीपमधून उमेदवार रस्त्यावर असलेल्या नागरिकांना अभिवादन करतानाचे दृश्य पहायला मिळाले.

Maharashtra Election 2019 ; Cooling propaganda guns | Maharashtra Election 2019 ; शक्तिप्रदर्शनानंतर थंडावल्या प्रचार तोफा

Maharashtra Election 2019 ; शक्तिप्रदर्शनानंतर थंडावल्या प्रचार तोफा

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक । यवतमाळात सर्वांचीच बाईक रॅली, आता प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर, ‘रसद’ पुरवणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस सर्वांनीच शक्तीप्रदर्शन करून गाजविला. जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात बहुतांश उमेदवारांनी मोटरसायकल रॅली काढून आपला माहोल तयार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकानेच जिंदाबादचे नारे देत आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. यवतमाळ शहरात काँग्रेस, भाजप, शिवसेना बंडखोर, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, विदर्भ राज्य आघाडी व अपक्ष उमेदवारांनी मोटर सायकल रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळात शहरातील रस्त्यांवर दुचाकींची वर्दळ अचानक वाढली.
जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येकच उमेदवाराने शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन केले होते. विशेष करून यवतमाळ शहरात बाईक रॅली व हातात ध्वज घेऊन नारे देत दुचाकीस्वार गल्लोगल्ली दिसत होते. खुल्या जीपमधून उमेदवार रस्त्यावर असलेल्या नागरिकांना अभिवादन करतानाचे दृश्य पहायला मिळाले. सकाळी ७ वाजतापासूनच शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर कार्यकर्त्यांनी दुचाकीसह गर्दी केली होती. उमेदवारांकडून प्रत्येक दुचाकीस्वाराला पेट्रोल देण्यात आले होते. एकाच वेळी दुचाकी पेट्रोल पंपावर आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. यवतमाळातील बसस्थानक चौक, दत्त चौक, शारदा चौक, गांधी चौक, हनुमान आखाडा चौक, पाचकंदील चौक, स्टेट बँक चौक, पोस्ट ऑफीस चौक या परिसरातून मोटरसायकल रॅलींनी मार्गक्रमण केले. यामुळे बऱ्याच भागात वाहतुकीची कोंडी झाली होती.
जिल्ह्यातील उमरखेड, पुसद, दिग्रस, आर्णी, राळेगाव, वणी या विधानसभा मतदारसंघातसुद्धा सर्वच पक्ष व अपक्ष उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. दिग्रसमध्ये या शक्तिप्रदर्शनासाठी भाजप बंडखोराने चक्क सिनेकलावंतांना पाचारण केले होते. सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपताच सर्व प्रचार वाहने जमा करण्यात आली. यावेळेस उमेदवारांना प्रचारासाठी तब्बल १२ दिवसांचा अवधी मिळाला. त्यातही नवरात्रोत्सव आला. आता प्रत्यक्ष मतदानाला ३६ तास शिल्लक आहेत. उमेदवार घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत असून त्यातून खऱ्या अर्थाने रात्रीतून हवा पलटविण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी दारू, पैसा व इतर प्रलोभने दिली जाण्याची शक्यता आहे. याकरिताच निवडणूक विभागाने व स्थानिक प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे. विविध मार्गांवर असलेले तपासणी नाके आता प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत आहे. रात्रीच्या हालचालींवर यंत्रणेची नजर राहणार आहे. उमेदवारही प्रतिस्पर्धांच्या मागावर रात्र जागणार आहे.
उमेदवारांसाठी रात्र वैऱ्याची
सोमवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी येणाऱ्या दोन रात्र उमेदवारांसाठी वैऱ्याच्या ठरणाऱ्या आहे. शेवटच्या घटकाला समर्थन मिळविण्यासाठी कुठल्याही क्लुप्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. ते टाळण्याकरिता रिंगणातील उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांच्या मागावर फिरणार आहे. शिवाय मतदान काढण्यासाठी बुथचे नियोजनही केले जात आहे. मतदार याद्या पोहोचविणे व बुथ नियोजनासाठी पूर्वी केलेली आखणी अमलात आणण्याचे काम सुरू आहे. शेवटच्या काही तासात अनेकदा अफवांचे पेव फोडण्यात येते. आता सोशल मीडिया सक्रिय असल्याने याचा फायदा होण्यासाठी अशा अफवांचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Cooling propaganda guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.