अमोलकचंदमध्ये महापरिनिर्वाण दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:56 IST2018-12-09T21:56:17+5:302018-12-09T21:56:46+5:30
येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.

अमोलकचंदमध्ये महापरिनिर्वाण दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले.
व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.ललित बोरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या दोघांनीही भाषा, धर्म, पंथ याचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे, असे सांगून यासोबतच इतरांच्या भाषा, धर्म, पंथांचा आदरही केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आपली मने जोपर्यंत विस्तृत होत नाही तोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही. डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची कास धरून आपली मने उन्नत करण्याचा संकल्प करावा, हीच खरी डॉ.आंबेडकर यांना आदरांजली ठरेल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागृती करण्यासाठी संविधान दिवस ते महापरिनिर्वाण दिनापर्यंत भाषण, निबंध, प्रश्नमंजुषा आदी उपक्रम राबविण्यात आले. संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे प्रा. जी.आर. खंडेराव यांनी वाचन केले. याप्रसंगी अशोक खरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी प्रा.जी.आर. खंडेराव, प्रा.ए.एम. मनवर, डॉ.डी.बी. प्रबोधनकार, डॉ.क्षमा कळणावत, प्रा.अंजू फुलझेले, प्रा.किशोर तायडे आदींनी सहकार्य केले. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सीए प्रकाश चोपडा व प्राचार्य डॉ.राममनोहर मिश्रा यांनी यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.