कवठाबाजारमध्ये महिलाराज
By Admin | Updated: March 8, 2016 02:31 IST2016-03-08T02:31:40+5:302016-03-08T02:31:40+5:30
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर पैनगंगेच्या तीरावर वसलेले गाव म्हणजे कवठाबाजार. सध्या या गावाच्या विकासाची दोरी

कवठाबाजारमध्ये महिलाराज
हरिओम बघेल ल्ल आर्णी
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर पैनगंगेच्या तीरावर वसलेले गाव म्हणजे कवठाबाजार. सध्या या गावाच्या विकासाची दोरी खऱ्या अर्थाने महिलांच्या हाती आहे. सरपंच, पोलीस पाटील, सोसायटी अध्यक्ष, कोतवाल आणि वैद्यकीय अधिकारीही येथे महिलाच आहे. महिलांच्या हाती आलेल्या कारभाराने गावाची दशाच पालटली. विकासाचे दमदार पाऊल टाकले जात आहे.
कवठाबाजारच्या सरपंचपदी संगीता रामेश्वर चौधरी यांना २०१३ साली गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने विराजमान केले. राणीधानोरा माहेर असलेल्या संगीताच्या माहेरी आणि सासरीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र गावकऱ्यांच्या विश्वासाला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही. आपल्या सरपंच पदाच्या कारकीर्दीत त्या गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन आहे. पोलीस पाटील पदी अंजना गोपाल मत्पलवार यांची निवड स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून झाली आहे. १२ वी पास झालेल्या अंजनाचे माहेर आणि सासर कवठाबाजारच आहे. शेतकरी कुटुंबातील अंजनाला गावाची खडान्खडा माहिती असल्याने पोलीस पाटील पदाला एक वेगळीच उंची त्यांनी मिळवून दिली आहे. ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीबाई सदाशिव गुटे विराजमान आहे. त्या आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्याही संचालक आहे. नांदेड जिल्ह्यातील माहाकोळी माहेर असलेल्या लक्ष्मीबाई गुटे यांनी सहकारातून विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. कवठाबाजार येथे असलेल्या शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयाचा कारभारही महिलेच्याच हाती आहे. डॉ. रश्मी अरुण आडे यांची येथे नियुक्ती झाली आणि तेव्हापासून महिलांच्या आरोग्याचा प्रश्न जवळपास सुटला आहे. मायेच्या ममतेने त्या रुग्णांवर उपचार करतात. एवढेच नाही तर या भागाच्या जिल्हा परिषद सदस्याही महिलाच आहे. अंबोडा येथील मिनाक्षी विलास राऊत या भागाचे प्रतिनिधीत्व करतात.
गावाच्या प्रथम नागरिकांपासून थेट कोतवालापर्यंत महिला राज असल्याने कवठाबाजार तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे.
प्रीती झाली गावची कोतवाल
४कोतवाल म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. महसुलातील सर्वात शेवटचे पद असलेल्या कोतवालपदी प्रीती गणेश चौधरी यांची पहिल्यांदा निवड झाली तेव्हा अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. मात्र १२ वी शिकलेल्या प्रीतीने आपल्या गुणाच्या जोरावर या पदालाही न्याय मिळवून दिला आहे. दिग्रस तालुक्यातील लाखरायाजी येथील माहेर असलेल्या प्रीती आज महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सहकार्य करते. गावाच्या सर्व समस्या सोडविण्यात आणि विकास कामात ती हिरहिरीने भाग घेते.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ असे म्हटले जाते. जर महिलांच्या हाती गावाच्या विकासाची दोरी आली तर गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर आर्णी तालुक्यातील कवठाबाजारला जावे लागेल. येथील सरपंच, सोसायटी अध्यक्ष, पोलीस पाटील एवढेच काय कोतवालही महिलाच आहे. येथील डॉक्टरही महिलाच आहे.
कवठाबाजार येथे असलेल्या आयुर्वेदिक दवाखान्याचा संपूर्ण भार वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी अरुण आडे सांभाळत आहे. नागरिकांच्या आरोग्यात कुठेही तडजोड करीत नाही. रुग्णांना मायेने औषधोपचार करते.
कोतवाल पद म्हणजे पुरुषांची मक्तेदारी मात्र बारावी झालेल्या प्रीती गणेश चौधरी यांनी मोडित काढली. महसूलमध्ये सर्वात शेवटचे पद असलेल्या कोतवाल पदावर त्या कार्यरत आहे.
४राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या संगीता चौधरी यांनी सरपंचपदाची धुरा सांभाळली आणि गावाच्या विकासाला वेगळे वळण देत आहे. तर पोलीस पाटीलपदी असलेल्या अंजना मत्पलवार गावाच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेऊन निर्भयपणे काम करीत आहे. सासर आणि माहेर एकच असल्याने अडचण नाही.