यवतमाळ नगरपरिषदेत महिलाराज
By Admin | Updated: December 20, 2014 02:10 IST2014-12-20T02:10:19+5:302014-12-20T02:10:19+5:30
नगरपरिषदेतील पाणीपुरवठा समितीवगळता उर्वरित पाचही समिती सभापतीपदी महिलांची निवड करण्यात आली.

यवतमाळ नगरपरिषदेत महिलाराज
यवतमाळ : नगरपरिषदेतील पाणीपुरवठा समितीवगळता उर्वरित पाचही समिती सभापतीपदी महिलांची निवड करण्यात आली. प्रथमच सर्वच्या सर्व समित्यांची जबाबदारी महिलांवर सोपविण्यात आली आहे. या निवडीने नगरपरिषदेत खऱ्या अर्थाने महिलाराज अवतरले आहे.
नगरपरिषदेतील सहा समित्यापैकी पाच समितीवर भाजपाचे वर्चस्व आहे. आरोग्य आणि वैद्यकीय समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूणा दिगांबर गावंडे यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या प्रणिता विजय खडसे यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापती, रेखा अशोक कोठेकर शिक्षण समिती सभापती, नंदा संजय जिरापूरे नियोजन व विकास समिती सभापती, मिना राहूल मसराम महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून निवड करण्यात आली. तर पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीचे उपाध्यक्ष मनिष दुबे पदसिद्ध सभापती आहेत. स्थायी समिती सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुमित बाजोरिया, भाजपाचे प्रवीण प्रजापती आणि काँग्रेसकडून राधिका संतोष बोरेले यांची निवड करण्यात आली.
समिती निवड प्रक्रियेच्या पहिल्या सत्रात समिती सदस्यांची निवड करण्यात आली. बांधकाम समिती, शिक्षण समिती आणि आरोग्य व वैद्यकीय, नियोजन व विकास समिती, आणि महिला व बालकल्याण समितीमध्ये प्रत्येकी १३ सदस्यांची निवड करण्यात आली. तसेच पाणी पुरवठा व जलनि:सारण समितीवर १२ सदस्यांची निवड केली. सर्वच गटाकडून समितीसाठी नावे देण्यात आली. त्यानंतर समिती सभापती व स्थायी समिती सदस्यासाठी प्रत्येकी एक नाव आल्याने ही प्रक्रिया अविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी नरेंद्र टापरे यांनी जाहीर केले. गटनेत्याबाबत १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांडे देण्यात आलेल्या अर्जामुळे काही संदिग्धता निर्माण झाली होती. मात्र किरकोळ आक्षेपानंतर ही निवड प्रक्रिया निर्विवाद पार पडली.
यावेळी प्रभारी मुख्याधिकारी दीपककुमार मिना, मुख्याधिकारी राजेंद्र मोहिते उपस्थित होते. निवडीनंतर फटाके फोडून आणि ढोलताशांच्यागजरात नगरपरिषदेसमोर जल्लोष करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)