महागाव तालुक्यात ७५ दिवसांत ५४१ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:42 IST2021-08-15T04:42:13+5:302021-08-15T04:42:13+5:30
महागाव : तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते १४ ऑगस्टपर्यंत ७५ दिवसांमध्ये ५४१ मिलिमीटर पाऊस कोसळला. मात्र, गेल्या २० ...

महागाव तालुक्यात ७५ दिवसांत ५४१ मिलिमीटर पाऊस
महागाव : तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते १४ ऑगस्टपर्यंत ७५ दिवसांमध्ये ५४१ मिलिमीटर पाऊस कोसळला. मात्र, गेल्या २० दिवसांपासून तालुक्यातून पाऊस गायब झाला आहे.
तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ९३५ मिलिमीटर एवढी आहे. सरासरीच्या निम्म्याअधिक पावसाची नोंद झालेली असताना तालुक्यातून वाहणारी पैनगंगा व सीप नदी आणि अन्य नदी, नाल्यांना अद्यापही मोठा पूर गेला नाही. आतापर्यंत झालेला पाऊस कापूस, सोयाबीन अन्य पिकांसाठी लाभकारक ठरला. त्यामुळे पीक परिस्थिती उत्तम आहे. मात्र, पावसाची हीच गती राहिल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे.
नागपंचमीपासून २४ दिवसांनी पोळा सण येतो. पोळ्यानंतर पाऊस भोळा होतो, अशी ग्रामीण भागात म्हण आहे. त्यामुळे मध्यंतरी पावसाचा पडलेला खंड पाहू जाता उन्हाळ्यात काय होणार, याची चिंता आतापासून सर्वांना भेडसावू लागली आहे. आजूबाजूचे धरण, तलाव क्षमतेने भरलेले आहे. त्यातील अतिरिक्त पाणीसाठ्याचा विसर्ग झाल्यामुळे नद्यांना पूर आला होता. परंतु, नैसर्गिक पावसामुळे नद्या-नाल्यांना अद्यापही पूर गेलेला नाही.
जून महिन्याच्या १७ दिवसांत २८१ मिलिमीटर, जुलैच्या १३ दिवसांत २०९ मिलिमीटर, तर अन्य दिवशी तुरळक अशा मिळून आतापर्यंत ५४१ मिलिमीटर पावसाची नोंद शासकीय दप्तरी झाली आहे.
बॉक्स
पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातुर
जुलै महिन्याच्या २४ तारखेपासून ते १४ ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड पडला आहे. तब्बल २२ दिवस पावसाने दडी मारलेली आहे. कापूस, सोयाबीन, अन्य खरिपाच्या पिकांना झालेला पाऊस फायदेशीर ठरला आहे. त्यामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती सध्या अतिशय उत्तम आहे. मात्र, आता पावसाच्या दडीने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.