महागाव तहसीलचा लिपिक निलंबित

By Admin | Updated: May 27, 2015 02:13 IST2015-05-27T02:13:23+5:302015-05-27T02:13:23+5:30

जिल्ह्याच्या प्रशासनातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा इशारा नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी दिला होता.

Mahagaon tahsil clerk suspended | महागाव तहसीलचा लिपिक निलंबित

महागाव तहसीलचा लिपिक निलंबित

यवतमाळ : जिल्ह्याच्या प्रशासनातील कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा इशारा नवनियुक्त जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी दिला होता. याची सुरूवात त्यांनी महागाव तहसील कार्यालयापासून केली. महागाव तहसीलच्या लिपिकाने सहा महिन्यांपासून कॅशबुकच भरले नव्हते. त्यामुळे या लिपिकाला थेट निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महागाव तहसीलमध्ये लिपिक सी.के. कळणे यांच्या दफ्तर दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या प्रभारी तहसीलदारांनी कळणे याच्या बदलीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवला. जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी त्या प्रस्तावातील कारणांचे अवलोकन केले असता कॅशबुक सहा महिन्यांपर्यंत न भरण्याचा प्रकार समोर आला. या गंभीर प्रकारासाठी बदली हा पर्याय ठरु शकत नाही, असे ठणकावत थेट त्या लिपिकाच्या निलंबनाचा आदेश काढा असे निर्देश अधिनस्थ यंत्रणेला दिले. त्यानुसार प्रभारी तहसीलदारांकडून निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर स्वाक्षरी करून सी.के. कळणे यांचे निलंबन केले. जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्याच बैठकीत आपल्या सहकाऱ्यांना बजावले होते. (कार्यालय प्रतिनिधी)

सुटीवर जाण्यापूर्वी द्यावा लागेल प्रभार
जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचारी सुटीवर जाण्यापूर्वी आपला प्रभार विभाग प्रमुखाकडे सुपूर्द करत नाही. त्यामुळे बरेचदा तातडीच्या बैठकांमध्ये माहिती उपलब्ध होत नाही. विभागप्रमुखाकडून कर्मचारी सुटीवर असल्याची सबब पुढे केली जाते. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश काढले असून, कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी रजेवर जाण्यापूर्वी आपल्याकडे असलेल्या कपाटाची किल्ली कार्यालयात जमा करावी असे निर्देश दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडून या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही, त्यासाठी त्यांच्या विभागप्रमुखाला जबाबदार धरण्यात येईल अशीही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आता कार्यालयाच्या किल्ल्या घेऊन गैरहजर राहणे कर्मचाऱ्यांना महाग पडणार आहे.

Web Title: Mahagaon tahsil clerk suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.