महागाव पंचायत समिती सदस्याला कारावास
By Admin | Updated: May 1, 2016 02:25 IST2016-05-01T02:25:01+5:302016-05-01T02:25:01+5:30
येथील पंचायत समितीचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे सदस्य भिका चव्हाण यांना धनादेश अनादर प्रकरणात पुसद न्यायालयाने ...

महागाव पंचायत समिती सदस्याला कारावास
धनादेश अनादर : पुसद न्यायालयाचा निकाल
महागाव : येथील पंचायत समितीचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे सदस्य भिका चव्हाण यांना धनादेश अनादर प्रकरणात पुसद न्यायालयाने शनिवारी सहा महिने कारावासाची शिक्षा आणि चार लाख रुपये दंड ठोठावला आहे.
पंचायत समिती निवडणुकीदरम्यान भिका चव्हाण यांनी दौलतराव नाईक यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. याबद्दल भिका चव्हाण यांनी नाईक यांना महागाव येथील युनियन बँकेचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वठविण्यासाठी टाकला असता तो अनादरीत होवून परत आला. त्यानंतर नाईक यांनी पैशाची मागणी केली. परंतु पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर महागाव न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. त्यानंतर भिका चव्हाण यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल करून पुसद न्यायालयात प्रकरण चालविण्याची विनंती केली. तेव्हा सदर प्रकरण महागाव न्यायालयातून पुसद न्यायालयात वर्ग करून लवकर निर्णय देण्याचे आदेश दिले.
शनिवारी पुसद येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी शरद देशपांडे यांनी या प्रकरणी निर्णय दिला. पंचायत समिती सदस्य भिका चव्हाण यांना सहा महिने शिक्षा आणि चार लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. दौलत नाईक यांची बाजू अॅड.विवेक देशमुख यांनी मांडली. आरोपी भिका चव्हाण यांना अपिलासाठी चार आठवड्याची मुदत देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. (शहर प्रतिनिधी)