पुण्याचा महादेव सरगर प्रथम पुरस्काराचा मानकरी
By Admin | Updated: November 27, 2015 02:39 IST2015-11-27T02:39:48+5:302015-11-27T02:39:48+5:30
वेळ रात्री ११.३०... कार्तिक पौर्णिमेच्या दुधाळ व आल्हाददायक प्रकाशात शिवकालीन हलगी व तुतारीने भारलेले वातावरण.

पुण्याचा महादेव सरगर प्रथम पुरस्काराचा मानकरी
इनामी काटा कुस्ती : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन
नीलेश भगत यवतमाळ
वेळ रात्री ११.३०... कार्तिक पौर्णिमेच्या दुधाळ व आल्हाददायक प्रकाशात शिवकालीन हलगी व तुतारीने भारलेले वातावरण. हनुमान आखाड्याच्या लाल मातीच्या हौदात पुण्याचा धाडधिप्पाड व कसलेला महादेव सरगर आणि भिलाईचा तरणाबांड अवधेश पहेलवान अव्वल स्थानासाठी झुंजत होते. तुल्यबळ लढत... प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला... तेवढ्यात महादेव पहेलवानाने सवारी डाव टाकला व एकलिंगी करून अवधेशला अस्मान दाखविले. १५ मिनिट रंगलेल्या कुस्तीत महादेव सरगरने बाजी मारली व प्रतिष्ठेच्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृती कुस्त्यांच्या दंगलीत स्व. सुभाषदादा बाजोरिया यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे ५१ हजार रुपयांचे बक्षीस व स्मृतिचिन्ह पटकाविले.
यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त २५ नोव्हेंबर रोजी लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चीफ माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सात लाख रुपयांच्या इनामी काटा कुस्त्यांची विराट दंगल स्थानिक श्री हनुमान आखाड्याच्या प्रांगणात पार पडली. या स्पर्धेत दिल्ली, भिलवाडा (राजस्थान), हरियाणा, भिलाई (छत्तीसगड), मुंबई, पुणे, सोलापूर, परभणी, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, अमरावती, अकोला, पुसद आदी शहरातील ५०० मल्लांनी सहभाग घेतला. पुण्याच्या महादेव सरगरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते जिल्हा कुस्तीगीर संघ तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, प्रशांत बाजोरिया, प्रताप पारस्कर, सुरेश जयसिंगपुरे, अनिल पांडे, जाफर गिलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाच्या ४१ हजार रुपयांच्या कुस्तीसाठी दिल्लीचा अनुभवी व कसलेला मल्ल कुलदीप आणि पुण्याचा गणेश जगताप यांच्यात तब्बल २० मिनिटे कुस्ती झाली. दोनही प्रतिस्पर्ध्यांनी भात्यातील सर्व डाव-प्रतिडाव आजमाविले. मात्र कोणीही अस्मान पाहायला तयार नव्हते. शेवटी दोघांच्या सहमतीने कुस्ती बरोबरीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ३१ हजार रुपयांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी कुमार गटातील महाराष्ट्र केसरी विजेता पुण्याचा संग्राम पाटील व योगेश पहेलवान नांदेड यांच्यात काट्याची लढत झाली. मात्र १८ मिनिटे रंगलेल्या या कुस्तीत कोणीही चित होऊ न शकल्याने दोघांनाही बक्षीस विभागून देण्यात आले. चौथ्या क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे बक्षीस आशिया ज्युनिअर गटाचा विजेता मुंबईचा संदीप काटेकर याने अवघ्या तीन मिनिटात पुण्याच्या शिवराज पहेलवानाला चित करून पटकाविले. दिल्लीचा अनुभवी मल्ल हितेंद्र पहेलवानने पुण्याच्या बालाजी पहेलवानाला अवघ्या दहा सेकंदात धूळ चाखवून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा प्रत्यय देत पाचव्या क्रमांकाचे २० हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले. या लढतीत बालाजी पहेलवानाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने काहीवेळ वातावरण गंभीर बनले होते.
१५ हजार रुपयांचे सहावे बक्षीस पुसदच्या लक्ष्मण पहेलवानाने भिलवाडाच्या अविनाश पहेलवानाला धोबीपछाड देऊन जिंकले. प्रेक्षकांना या स्पर्धेतील काटा कुस्ती मदन पहेलवान परभणी विरुद्ध राकेश पहेलवान मुंबई या दोन मल्लांदरम्यान पाहायला मिळाली. २४ मिनिटे रंगलेल्या या कुस्तीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दोनही मल्लांनी डाव-प्रतिडाव, कौशल्य, ताकद, युक्ती सर्व पणाला लावले. मात्र दोघेही तुल्यबळ ठरल्याने निकाल बरोबरीत राहिला. दोघांना दहा हजार रुपये विभागून देण्यात आले. सात हजार रोखच्या कुस्तीत आदित्य पहेलवान (भिलवाडा) याने आबा अटकळे (पुणे) याला अवघ्या १५ सेकंदात ढाक मारून चित केले. पाच हजार रुपयांची कुस्ती निर्मल पहेलवान (भिलवाडा) याने जिंकली. हिंगोलीच्या सुनील पहेलवानने अमरवीर पहेलवानाला धूळ चारून तीन हजार रुपयांची कुस्ती जिंकली. हिंगोलीच्या रामदास पहेलवानाने दोन हजार रुपयांची कुस्ती मारली, तर अमरावतीच्या आदिल पहेलवानाने एक हजार रुपये रोख बक्षिसाची कुस्ती जिंकली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे प्रभाकर गटलेवार, रामेश्वर यादव, अनंता जोशी, रवी इंगोले, विठ्ठलराव भोयर, रवींद्र ढोक, अब्दुल जाकीर, शरद बजाज, पांडुरंग लांजेवार, शिक्षक नेते सुभाष धवसे यांनी परिश्रम घेतले. कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन अरुण जाधव व गोविंदसिंह सांघा यांनी केले.