‘मॅग्मो’ संघटनेने पुकारले असहकार आंदोलन
By Admin | Updated: February 9, 2016 02:11 IST2016-02-09T02:11:30+5:302016-02-09T02:11:30+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागात पुन्हा वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात संघर्षाला सुरूवात झाली आहे.

‘मॅग्मो’ संघटनेने पुकारले असहकार आंदोलन
जिल्हा परिषद : आरोग्य विभागात झाली संघर्षाला सुरूवात
यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागात पुन्हा वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात संघर्षाला सुरूवात झाली आहे. डीएचओंकडून अन्यायकारक कारवाई होत असल्याचा आरोप करत राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) असहकार आंदोलन पुकारले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड़ राठोड वैद्यकीय अधिकाऱ्यावर अन्यायकारक कारवाई करतात. ठोस कारण नसताना किरकोळ बाबींवरून निलंबनाची कारवाई केली जात आहे. विशेष करून संघटनेतील डॉक्टरांवर रोष व्यक्त केला जात असल्याचा आरोप मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. धर्मेश चव्हाण यांनी केला आहे. डीएचओंच्या मनमानी कारभारा विरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. चुकीची कारवाई मागे घेण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही निर्णयात कोणताच फरक पडला नाही. त्यामुळे आता १७ फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण जनतेला जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे प्रयत्न डीएचओंकडून केले जात असल्याचा आरोपही मॅग्मो संघटनेने केले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. धर्मेश चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ. किशोर कोषटवार, उपाध्यक्ष डॉ. अनिल सदांशिव, डॉ. शामकुमार शिंदे, डॉ. संजय मुरमुरे, डॉ. जब्बार पठाण, मधुकर मडावी आदींनी निवेदन दिले आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)
डीएचओंवर मनमानीचा आरोप
विविध कारणांवरून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर विनाकारण कारवाई होत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई करीत असल्याने संघटनेतील डॉक्टरांमध्ये रोष व्यक्त होत आहे. याबाबत यापूर्वीच संघटनेच्या वतीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसे निवेदनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आता हे असहकार आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. धर्मेश चव्हाण यांनी म्हटले आहे. ग्रामीण जनतेला जाणीवपूर्वक वेठीस धरले जात असल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात येत आहे. या असहकार आंदोलनाची झळ सर्वसामान्य नागरिकांनाच पोहचणार आहे.