३०० विशेष शिक्षकांवर गदा
By Admin | Updated: May 29, 2017 00:47 IST2017-05-29T00:47:57+5:302017-05-29T00:47:57+5:30
विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच कलानिपुण आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी विशेष शिक्षकांची गरज आहे.

३०० विशेष शिक्षकांवर गदा
संचमान्यतेतून गायब : तासिका घटल्याने मोबदलाही अर्ध्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच कलानिपुण आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी विशेष शिक्षकांची गरज आहे. मात्र, एकीकडे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा घोष करणाऱ्या प्रशासनाने कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या तासिका कमी केल्या. याचा फटका जिल्ह्यातील तब्बल ३०० विशेष शिक्षकांना बसला आहे. गंभीर म्हणजे, शासनाने या शिक्षकांची पदेच संचमान्यतेतून गायब केली आहेत.
खासगी शिक्षण संस्थांच्या जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षक कार्यरत होते. परंतु, संचमान्यतेत ही पदे दाखविण्यातच आली नाही. त्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. तात्पुरता तोडगा म्हणून काही संस्थाचालकांनी व प्रशासनाने या शिक्षकांना कला, क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत ठेवले. तासिका तत्वावर तुटपुुुंजा मोबदला मिळवून हे शिक्षक कार्यरत आहेत. ५ ते १० वर्ग असलेल्या शाळांमध्ये एक कला, एक क्रीडा, कार्यानुभव आणि संगीत शिक्षक आहे. परंतु, शिक्षण आयुक्तांनी आता शालेय तासिकांची फेरआखणी करताना कला, क्रीडा आणि कार्यानुभव विषयांच्या तासिका कमी केल्या आहेत.
कला शिक्षकांना पूर्वी आठवड्यातून ४ तासिका मिळायच्या. त्या आता केवळ दोनच मिळणार आहेत. त्यानुसार, त्यांना मिळणारा मासिक मोबदलाही अर्धा होणार आहे. शिवाय, ही पदे आता भरूच नये, तर त्याऐवजी ‘मोफत’ शिकवणारे अतिथी निदेशक हे पद भरावे, अशा सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कला शिक्षकांचे अस्तित्व पणाला लागले आहे. या ३०० कला शिक्षकांसह त्यांचे कुटुंबियही आता संकटात सापडले आहे.