आॅनलाईन कर भरण्याच्या सुविधेला अल्प प्रतिसाद
By Admin | Updated: July 13, 2016 03:10 IST2016-07-13T03:10:26+5:302016-07-13T03:10:26+5:30
शहरातील नागरिकांना आता आॅनलाईन प्रणालीव्दारे कर भरता येऊ शकतो. ही सुविधा उपलब्ध होऊनही त्याला अद्याप फारसा प्रतिसाद लाभला नाही.

आॅनलाईन कर भरण्याच्या सुविधेला अल्प प्रतिसाद
यवतमाळ नगर परिषद : ‘आपले सरकार पोर्टल’वर सोय, कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही
यवतमाळ : शहरातील नागरिकांना आता आॅनलाईन प्रणालीव्दारे कर भरता येऊ शकतो. ही सुविधा उपलब्ध होऊनही त्याला अद्याप फारसा प्रतिसाद लाभला नाही. परिणामी नगरपरिषदेच्या कर विभागात कर भरण्यासाठी अद्यापही करदात्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात.
शासकीय कार्यालयामंध्ये आता संगणकीय प्रणालीची सुरूवात करण्यात आली आहे. शासनाने विविध सेवासांठी ‘आॅनलाईन’ प्रक्रिया सुरू केली आहे. तहसील कार्यालयात तर आॅनलाईन प्रणालीव्दारे सातबारा, फेरफार आदी मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तोच कित्ता गिरवीत शासनाने आता नगरपरिषदेतही आॅनलाईन प्रणाली सुरू केली. त्यात करदात्यांना आॅनलाईन कर भरण्याचीही सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनाने ‘आपले सरकार’ नामक पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर नगरपरिषद पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलव्दारे करदात्यांना घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. करदात्यांनी हे पोर्टल उघडून आपल्या नगरपरिषदेचे नाव क्लीक केल्यास त्यांच्यासमोर कर भरण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. ही सुविधा सुरू होऊन अनेक महिने लोटले. मात्र अद्याप या प्रणालीला करदात्यांचा फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. अद्यापही करदाते नगरपरिषदेच्या कर विभागासमोर कर भरण्यासाठी रांगा लावतच आहेत.
वीज देयक, टेलिफोन देयक भरण्यासाठी सध्या आॅनलाईन प्रणालीचा जादा उपयोग केला जात आहे. याचसोबतच विविध अर्ज, नोकरीविषयक अर्ज भरण्यासाठी आॅनलाईन प्रणालीचा उपयोग केला जातो. जवळपास प्रत्येक विभागानेच आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आयकर विभागही आॅनलाईन प्रक्रियेव्दारे विविध अर्ज सादर करण्याची संधी देते. जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्रही आता आॅनलाईन मिळू शकते. तशीच संधी नगरपरिषदेने कर भरण्यासाठीही उपलब्ध करून दिली आहे. मात्र अद्याप करदात्यांनी या संधीला अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. घरबसल्या कर भरण्यासाठी करदात्यांनी या आॅनलाईन प्रक्रियेचा वापर केल्यास त्यांना रांगा लावण्याची गरज भासणार नाही. (शहर प्रतिनिधी)
कर प्रणाली किचकट असल्याने त्रास
अनेक नागरिक आॅनलाईन प्रकियेचा वापर करून टेलिफोन तसेच वीज देयकाचा भरणा करतात. बहुतांश विद्यार्थीही प्रवेश प्रक्रिया अथवा नोकरी संबंधातील अर्जही आॅनलाईन प्रणालीव्दारेच सादर करतात. मात्र आॅनलाईन कर भरण्याकडे करदात्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्याला किचकट कर प्रणाली कारणीभूत ठरत आहे. अनेकदा करदात्यांचा जादा कर आल्याचा समज होतो. मालमत्ता कर असल्याने नेमकी आपली मालमत्ता किती, त्यावर कोणत्या पद्धतीने कर लावण्यात आला, कर जादा का येतो, इतर करदात्यांना तेवढ्याच मालमत्तेसाठी किती कर आकारला जातो, याची शहानिशा करण्यासाठी अनेक करदाते आॅनलाईनऐवजी थेट नगरपरिषद गाठून कर विभागासमोर रांगा लावतात. त्यामुळे अद्याप या आॅनलाईन सुविधेला अल्प प्रतिसाद लाभत असावा, कसा कयास वर्तविला जात आहे.