वाघापूरला कमी दाबाने पाणी
By Admin | Updated: May 18, 2017 00:51 IST2017-05-18T00:51:41+5:302017-05-18T00:51:41+5:30
यावर्षी वाघापूर परिसरात तीव्र अशी पाणीटंचाई सध्या तरी नाही. आठवड्यातून दोनवेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ येतात.

वाघापूरला कमी दाबाने पाणी
टिल्लू मशीनचा उच्छाद : पहिल्या माळ्यावरही पाणी पोहचत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी वाघापूर परिसरात तीव्र अशी पाणीटंचाई सध्या तरी नाही. आठवड्यातून दोनवेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ येतात. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळते. परंतु या नळांना दाब कमी असल्यामुळे पाणी भरायला चांगलाच वेळ लागतो. तसेच वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही.
मागील वर्षी एप्रिल महिन्यापासूनच वाघापूर परिसरात तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. त्यामुळे नगर परिषद व काही समाजसेवींकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे सध्या तरी आठवड्यातून दोनवेळा नळाला पाणी येत आहे. तसेच बोअरवेल आणि हातपंपांनाही काही प्रमाणात का होईना पाणी आहे. त्यामुळे मे महिन्यातील पाणीटंचाई फारसी जाणवत नसल्याचे जयविजय चौक, बोरुंदिया नगर, पटवारी कॉलनी, माधव नगर या परिसरातील नागरिकांनी सांगितले. तर नळाच्या पाण्याला दाब नसल्यामुळे टेकडी परिसर, राऊत नगर, महात्मा फुले सोसायटी या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. या भागातील अनेक बोअरवेलही कोरड्या पडल्या. हातपंपांचीसुद्धा दूरावस्था आहे. अशा स्थितीत येथील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जय विजय चौक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक फ्लॅट स्किम मध्ये राहतात. या ठिकाणी ग्राऊंड फ्लोअर सोडल्यास वरच्या कोणत्याही मजल्यावर पाणी पोहचत नाही. त्यामुळे नागरिकांना खालून पाणी न्यावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने एक गुंड भरायलाही १५ ते २० मिनिटे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. या परिसरातील लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली असता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिलासादायक चित्र असल्याचे ते म्हणाले. अद्याप नागरिकांकडून टँकरची मागणी झाली नसली तरी काही दिवसातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आठवड्यातून एकदाच नळ सोडले जाईल, त्यानंतर मात्र गोंधळ उडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नगर परिषदेकडून अद्याप टँकरबाबत आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे वेळेवर मोठी पंचायत निर्माण होऊ शकते. वाघापूरसह शहरातील पिंपळगाव, वडगाव, उमरसरा, भोसा, मोहा आदी परिसरातील सध्याची आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नगर परिषदेने तयारीत राहणे गरजेचे आहे.
आता संपूर्ण भिस्त लोहाऱ्याच्या टाकीवर
लोहारा बायपासवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नवीन टाकी बांधण्यात आली. मागे या टाकीची ट्रायल घेण्यात आली होती. त्यामध्ये समाधानकारक परिणाम दिसून आले नाही. त्यामुळे आवश्यक त्या सुधारणा करण्यात येऊन सध्या ही टाकी पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. लोहारा आणि वाघापूर परिसरालाही या टाकीचा मोठा फायदा होणार आहे. सध्या यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणातच पाणी नसल्याने ही टाकी भरणे आणि या टाकीतून पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यासाठी पावसाळ्याचीच वाट पाहावी लागेल. परंतु एकदा ही टाकी सुरू झाली की वाघापूर आणि लोहारा परिसरातील नागरिकांना चांगला दिलासा मिळणार आहे.