भगवान महावीर जयंती शोभायात्रेने लक्ष वेधले
By Admin | Updated: April 10, 2017 01:58 IST2017-04-10T01:58:54+5:302017-04-10T01:58:54+5:30
सत्य तथा अहिंसेचे दूत भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पुसद, उमरखेड आणि दिग्रसमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले.

भगवान महावीर जयंती शोभायात्रेने लक्ष वेधले
जन्म कल्याणक महोत्सव : पुसद, उमरखेड, दिग्रसमध्ये जयंती उत्साहात
पुसद : सत्य तथा अहिंसेचे दूत भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पुसद, उमरखेड आणि दिग्रसमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले. आबालवृद्ध या शोभायात्रेत सहभागी झाले होते. सकल जैन समाजाच्यावतीने ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अहिंसेचे पुजारी भगवान महावीर यांची जयंती पुसद येथे सकल दिगंबर जैन समाजाच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. जैन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेच्या अग्रभागी भगवान महावीरांची मोठी प्रतिमा होती. त्यानंतर आचार्य विद्यासागर पाठशाळेतील चिमुकल्यांचे लेझीम पथक, जैन सोशल महिला मंचच्या महिलांचे टिपरी नृत्य, ढोल पथक सहभागी झाले होते. ही शोभायात्रा जैन मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, गुजरी चौक, संतोषी माता मंदिर, आझाद चौक, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, कापड लाईन, नगिना चौक मार्गे जैन मंदिरात पोहोचली. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहर अध्यक्ष भारत पाटील, रमेश गायकवाड, अक्षय बोंपीलवार, रमेश सोमानी, मिलिंद बांडे, श्रीकांत नरसिंग, रमेश वाळले, संतोष आर्य यांनी ही व्यवस्था केली होती. तत्पूर्वी सकाळी ५ वाजता सकल दिगंबर जैन समाजातर्फे प्रभातफेरी काढण्यात आली होती. त्यानंतर जैन मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीचा अभिषेक व पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील जैन बंधूभगिनी सहभागी झाले होते.
दिग्रस येथे रक्तदान शिबिर
दिग्रस : येथील सकल जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन केले असून रविवारी भगवान महावीर जयंतीनिमित्त बाबजी महाराज जैन मंदिरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने अवघे दिग्रस दुमदुमुन गेले होते. बाबजी महाराज जैन मंदिरात महावीर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी भगवान महावीरांच्या भव्य प्रतिमेची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. लेझीम पथक, विविध समाजप्रबोधनात्मक देखावे यात सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गांवरून ही शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर सामूहिक अभिषेक, पूजन, मंत्रोपचाराच्या गजरात भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. पुसद येथील मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात जैन समाज बांधवांसह इतर समाजबांधवांनी रक्तदान केले. बा.बू. कला, ना.भ. वाणिज्य आणि बा.पा. विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ. आर.आर. वानखडे यांच्या मार्गदर्शनात शिबिर यशस्वी करण्यात आले. महोत्सवासाठी बबन भागवतकर, डॉ. प्रशांत रोकडे, दीपक गड्डा, राजेंद्र सिंगवी, संतोष महेता, प्रा. बांदे, आनंद जैन, अॅड. रवींद्र कोठारी, डॉ. प्रदीप मेहता, दत्ता व्हंडाळे, सुनील गड्डा, अशोक नागरवाला, दीपक कोठारी, महेंद्र सिंगवी, खुशाल काराणी, रूपचंद कोस्तवाल, प्रदीप सिंगवी, खुशाल संगोई यांच्यासह सकल जैन समाजाच्या युवक-युवती, महिला व पुरुषांनी सहकार्य केले. (लोकमत चमू)
उमरखेडमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत
उमरखेड : भगवान महावीर जयंतीनिमित्त उमरखेड शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जैन मंदिरातून काढण्यात आलेली मिरवणूक गायत्री चौकात पोहोचली. त्यावेळी नगराध्यक्ष नामदेव ससाने, उपाध्यक्ष अरविंद भोयर, प्राचार्य डॉ. वि.ना. कदम, प्रकाश दुधेवार यांच्यासह शहरातील नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात महिला व पुुरुष सहभागी झाले होते. अॅड. संतोष जैन, विनोद जैन, संजय कस्तुरे, अनिल अन्नदाते, सतीश भागवते, मनोहर महाजन, प्रवीण जैन, शांतूसेठ जैन, विजयकुमार जैन, दिलीप रेदासनी, धरमीचंद रेदासनी, अक्षयकुमार जैन, आदेश जैन, चेतन जैन, सतेज जैन, मुन्ना जैन, प्रसन्न भन्साळी, इंदरचंद जैन यांच्यासह शहरातील जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी ठिकठिकाणी या मिरवणुकीचे शहरवासीयांनी स्वागत केले. ‘जिओ और जिने दो’च्या घोषणांनी संपूर्ण उमरखेड शहर दणाणून गेले होते. शोभायात्रेसाठी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)