वणीत वीज ग्राहकांची लूट

By Admin | Updated: January 15, 2017 01:06 IST2017-01-15T01:06:50+5:302017-01-15T01:06:50+5:30

वीज वितरण कंपनीच्या वीज देयक आकारणीचे ताळतत्र बिघडले असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loot of electricity consumers | वणीत वीज ग्राहकांची लूट

वणीत वीज ग्राहकांची लूट

रिडींग न घेता अवाढव्य देयके : एजन्सीवरील नियंत्रण सुटले
वणी : वीज वितरण कंपनीच्या वीज देयक आकारणीचे ताळतत्र बिघडले असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एजन्सीचे कर्मचारी मिटर रिडींग न घेता ग्राहकांची लुबाडणूक करण्यासाठी वीज वितरण कंपनीला सहकार्य करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांकडे कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत आहे. बाहेरील पथकाने शहरात येऊन वीज चोरी उघडकीस आणून लाखो रूपयाचा दंड वसुल करून स्थानिक अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब केले आहे.
वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या मिटरचे दरमहा फोटो रिडींग व देयके वितरणासाठी एका एजन्सीची नियुक्ती केली. मात्र ही एजन्सी ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत दरमहा पोहचत नाही. स्वत:च्याच मर्जीने ब्लॅक, रिडींग घेणे अवघड अशी कारणे दाखवून सरासरी युनिटचे देयक तयार केले जाते. मात्र सरासरीचे देयक तयार करताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे डोके ठिकाणावर नसते. त्यामुळे मीटरमध्ये दाखवीत असलेल्या आकड्यापेक्षाही अधिक युनिटचे बिल ग्राहकांना पाठविले जाते. एखाद्या महिन्यात ग्राहक सदर देयकाची रक्कम मुकाट्याने भरून टाकतो. मात्र एजन्सीचे एवढ्यावर भागत नाही. त्यापुढील महिन्यातही पुन्हा सरासरीचे बिल दिल्या जाते. दोन-तीन महिन्यानंतर रिडींग घेतल्यानंतर त्याला विजेचा दर टप्यानुसार अधिक लावण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांना अकारण भुर्दंड सहन करावा लागतो किंवा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारून देयक दुरूस्त करून द्यावे लागते. एजन्सीच्या या कामचुकार पणामुळे कार्यालयात देयक दुरूस्तीसाठी ग्राहकांची गर्दी होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यावरही कामाचा ताण वाढतो. परिणामी काही ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक न मिळाल्याने कर्मचारी व ग्राहक यांच्यात खटके उघडण्याच्या घटना घडत असतात.
शहरात मोठ्या प्रमाणात विज चोरी होत आहे. बाहेरील पथकाने नुकतीच शहरातील काही ग्राहकांची वीज चोरी उघडकीस आणून लाखो रूपये दंड वसुल केला. मग येथील अधिकाऱ्यांच्या वीज चोरी कशी लक्षात येत नाही, असा प्रश्न ग्राहक विचारीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Loot of electricity consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.