मानवाचे जगणे आनंदाच्या शोधासाठीच
By Admin | Updated: November 16, 2016 00:30 IST2016-11-16T00:30:30+5:302016-11-16T00:30:30+5:30
आनंद प्राप्तीची अपेक्षा आणि इच्छा ही आपल्या प्रत्येकातच विद्यमान असते. कारण आनंद हा मानवाचा मुलभूत स्वभाव आहे.

मानवाचे जगणे आनंदाच्या शोधासाठीच
अरविंद देशमुख : निवृत्त अभियंता मित्र मंडळाची व्याख्यानमाला
यवतमाळ : आनंद प्राप्तीची अपेक्षा आणि इच्छा ही आपल्या प्रत्येकातच विद्यमान असते. कारण आनंद हा मानवाचा मुलभूत स्वभाव आहे. मानवाचे जीवन जगणे हे आनंदाच्या शोधासाठी केलेला प्रवास आहे, असे उद्गार प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी काढले.
निवृत्त अभियंता मित्र मंडळाद्वारे आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ‘कशासाठी...? आनंदासाठी!’ या विषयावर ते बोलत होते. निवृत्त अभियंता मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपाळ भास्करवार अध्यक्षस्थानी होते. व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळे, किशोर कावलकर, संयोजक प्रमोद देशपांडे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय किशोर इंगळे यांनी करून दिला. वसुधा पांडे यांनी स्वागतगीत सादर केले. किशोर कावलकर यांनी आभार मानले. संचालन निवृत्त अभियंता मित्र मंडळाचे सचिव वसंत पांडे यांनी केले.
डॉ. अरविंद देशपांडे पुढे म्हणाले, सुखासाठी मानव सतत प्रयत्न करतो. परंतु प्रत्येकवेळी सुख मिळेलच याची शाश्वती नसते. सुख किंवा दु:ख याचा अधिक विचार न करता मानवाने आपली सहनशीलता वाढविली पाहिजे. एकदा सहनशीलतेमध्ये वाढ झाली की, आनंदाची मात्रा वाढू शकते. आनंद ही आंतरिक अवस्था असून बाह्य गोष्टीमुळे ही आंतरिक अवस्था भंग पावावयास नको, असे डॉ. देशमुख म्हणाले.
बाहेरची परिस्थिती बिघडली तरी आंतरिक अवस्था मात्र कुठेही बिघडवू न देणारी अनेक थोर मंडळी भारतात होवून गेली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विदर्भातील थोर संत गाडगेबाबा, सोपानदेव चौधरी, मोरारजी देसाई, प्राचार्य राम शेवाळकर ही काही उदाहरणे देता येतील. प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाचा पोत सांभाळावा. जीवन जगताना आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा. त्यासाठी आपल्या मनातील सुप्त महत्त्वाकांक्षा, अपेक्षा किंवा अनिष्ठ स्पर्धा आड येणार नाही याची काळजी घ्यावी, असे डॉ. देशमुख म्हणाले. मंडळाचे सहसचिव उत्तम राठोड यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)