‘नाम’ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर
By Admin | Updated: January 11, 2017 00:31 IST2017-01-11T00:31:40+5:302017-01-11T00:31:40+5:30
शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे.

‘नाम’ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर
मकरंद अनासपुरे : दिग्रस येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा
दिग्रस : शेतकऱ्यांनी संकटाला न घाबरता परिश्रमातून शेती पिकविली पाहिजे. परिश्रम केल्यानंतर संकट आलेच तर न घाबरता त्याच्याशी दोन हात करता आले पाहजे. याउपरही आत्महत्या करण्यासारखी वेळ आली तर नाम फाऊंडेशन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते तथा ‘नाम’ फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले.
ईश्वर देशमुख कृषी तंत्रनिकेतन आणि डेअरी टेक्नॉलॉजीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी भूषण कांतराव झरीकर, अर्चना मेहरकर, छाया राठोड, स्वप्नील देशमुख, सतीश इथापे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, विजय बंग, रवींद्र अरगडे, अॅड़ सुधाकर जाधव, प्रा. प्रेम राठोड उपस्थित होते. यावेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी-चोळी व मदतीचे वितरण करण्यात आले. तसेच ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे डेहणी येथील रानडुकराच्या हल्ल्यात जखमी गजानन इहरे या शेतकऱ्याला १५ हजार रुपयांचा धनादेश नाम फाऊंडेशनतर्फे देण्यात आला. त्यानंतर दुर्गामाता संस्थेव्दारा संचालित शाळा व महाविद्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ११ मुलींना मोफत शिक्षण तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
ईश्वर फाऊंडेशनच्या संयोजिका वैशाली देशमुख यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या विविध खेळ व स्पर्धेतील विजेत्यांना मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते १० महिलांना मानाची पैठणी व बक्षीस देण्यात आले. संचालन कपील बोरुंदीया व गिरीश बोबडे तर आभार राजू ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)