नजर पैसेवारीबाबत शेतकरीच आहेत अनभिज्ञ
By Admin | Updated: October 28, 2015 02:44 IST2015-10-28T02:44:54+5:302015-10-28T02:44:54+5:30
वणी तालुक्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना केवळ साखरा (को.) व जुगाद या दोनच गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी कशी आली,...

नजर पैसेवारीबाबत शेतकरीच आहेत अनभिज्ञ
वणी : वणी तालुक्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना केवळ साखरा (को.) व जुगाद या दोनच गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी कशी आली, हे कोडेच जनतेपुढे होते. मात्र यवतमाळ येथील लोकजागृती मंच या सामाजिक संस्थेने या कोड्याची उकल केल्याने सर्वांनाच धक्का बसला. या संस्थेने या दोन गावातील समितीच्या चौकस कामगिरीबद्दल समिती सदस्यांचा सत्कार केला. या उकलीमुळे प्रशासन मात्र चांगलेच तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे.
महसूल प्रशासनाने नुकतीच जिल्ह्यातील १४ हजार ७०८ गावांची पैसेवारी काढली. संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना केवळ दोनच गावे ५० पैशाच्या आत आली. जिल्ह्यात नऊ लाख ९६ हजार ५५० हेक्टर शेतजमीन पेरणीयोग्य आहे. परंतु विविध कारणामुळे २३ हजार १०८ हेक्टर जमिन पडीत राहिली. कापूस पीक चार लाख ७७ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरले गेले. दोन लाख ४८ हजार ५४९ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. मात्र अपुरा पाऊस व वातावरणातील विचित्र बदलाने दोन्ही पिके संकटात सापडली. सोयाबीन एकरी एक ते दोन क्विंटल पिकले. कापसाची झाडे वाळायला लागली. दिवाळीनंतर शेतकऱ्यांना कापूस वेचायला शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती आहे. तरीही जिल्हा दुष्काळग्रस्त ठरला नाही. त्यामुळे वास्तव जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या अध्यक्षतेखालील लोकजागृती मंच या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली.
या संघटनेमध्ये शैलेश इंगोले, शालिक चवरडोल, सय्यद रफिक, गजानन पाचोडे, संजय निकडे, वामन राठोड, वसंता पवार, संजय डंभारे, सय्यद शब्बू, जयवंता आडे, तुळशिराम आडे, रणजित जाधव, मिलींद चव्हाण, वासुदेव राठोड, सुभाष राठोड, हरिदास राठोड, सुहास काळे, लालसिंग अजमेरकर यांचा समावेश आहे. या चमूने रविवारी साखरा (को.) व जुगाद या गावांना भेट देऊन तेथील पीक परिस्थितीची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी असे आढळून आले, की या दोन गावांसारखी पीक परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांची आहे. मग इतर गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त कशी आली?, यावर समितीने चिंतन केले. त्यावेळी खरे वास्तव समोर आले.
साखरा व जुगाद या दोन गावातील समितीने वास्तविक परिस्थिती मांडली. इतर गावात अशा समितीने गठणच करण्यात आले नाही. केवळ मंडळ अधिकारी व तलाठ्यांनीच पैसेवारी काढून शासनाच्या दबावाखाली त्यांनी पैसेवारी फुगवून दाखविली. त्यामुळे पीक पडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत असतानाही गावाची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आली. परिणामी शेतकरी दुष्काळापासून दुरावला गेला. देवानंद पवार यांनी शासनाच्या शेतकरी भूमिकेवरही सडकून टिका केली. शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. शासनाचे बळीराजा चेतना अभियान म्हणजे ‘जखम मांडीला व मलम शेंडीला’ असा प्रयोग असल्याा आरोप त्यांनी केला. शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर राहून उपयोग नाही, तर गंभीर होणे गरजेचे असे त्यांनी स्पष्ट केले. या समितीने पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यात देवानंद पवार यांनी पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित करून जिल्हाधिकारीही शेतकऱ्यांवर बेगडी प्रेम करीत असल्याचा आरोप केला. शेतकरी तक्रार घेऊन भेटीसाठी गेला असता, त्याला धुडकावून लावले जाते. शासनाने जिल्ह्यातील पीक उत्पादनाचा वास्तविक आढावा घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)