बिबट्याच्या शिकार प्रकरणात लोणदरीच्या पिता-पुत्राला अटक
By Admin | Updated: October 25, 2014 22:47 IST2014-10-25T22:47:14+5:302014-10-25T22:47:14+5:30
शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातील सावरगाव बंगला जंगलात उघडकीस आलेल्या बिबट्याच्या शिकार प्रकरणात वनविभागाने पिता-पुत्राला अटक केली. शेळ्या मारल्याने बिबट्यावर विष प्रयोग केल्याची कबुली

बिबट्याच्या शिकार प्रकरणात लोणदरीच्या पिता-पुत्राला अटक
पुसद/शेंबाळपिंपरी : शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातील सावरगाव बंगला जंगलात उघडकीस आलेल्या बिबट्याच्या शिकार प्रकरणात वनविभागाने पिता-पुत्राला अटक केली. शेळ्या मारल्याने बिबट्यावर विष प्रयोग केल्याची कबुली या दोघांनी वन अधिकाऱ्यांपुढे दिली.
शेकोराव नारायण इंगळे (६५) आणि गणपत शेकोराव इंगळे दोघे रा. लोणदरी ता. पुसद अशी आरोपी पिता-पुत्राची नावे आहे. इंगळे यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. त्यामुळे इंगळे संतप्त झाले. या रागाच्या भरात त्यांनी मेलेल्या शेळ्यांवर विष टाकले. सदर शेळ्या बिबट्याने पुन्हा फस्त केल्या असता त्याचा विष बाधेने मृत्यू झाला. हा प्रकार आपल्या अंगलट येईल म्हणून बिबट्याचे कातडे सोलून प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली या दोघांनी वनअधिकाऱ्यांपुढे दिली.
पुसद तालुक्यातील सावरगाव बंगला जंगलामध्ये वनपथक बुधवारी गस्तीवर होते. कक्ष क्र.७१४ मध्ये एक बिबट्या चामडे सोललेल्या अवस्थेत आढळून आला होता. वनविभागाने चौकशी केली असता इंगळे पिता-पुत्राने त्याची हत्या केल्याची माहिती पुढे आली. या दोघांनाही अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. वन विभागाने अवघ्या दोन दिवसात बिबट्याची शिकार करणाऱ्या पिता-पुत्राला अटक केली. आता या पिता-पुत्राकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्यांची वन कोठडी घेतली जात आहे. (वार्ताहर)