लोहारातील महिला धडकल्या
By Admin | Updated: April 28, 2016 02:26 IST2016-04-28T02:26:31+5:302016-04-28T02:26:31+5:30
शहरात प्राधिकरणाचे नळ नसलेल्या भागात बोअरवेल आणि विहिरीवर भिस्त होती. आता हे स्रोत कोरडे पडले आहेत.

लोहारातील महिला धडकल्या
पाणीटंचाई : नगरपरिषद पाणीपुरवठा सभापतींवर प्रश्नांचा भडीमार, सहा टँकरचा विचारला जाब
यवतमाळ : शहरात प्राधिकरणाचे नळ नसलेल्या भागात बोअरवेल आणि विहिरीवर भिस्त होती. आता हे स्रोत कोरडे पडले आहेत. अशा ठिकाणी टँकरशिवाय पर्याय नाही. पाण्याचा गंभीर प्रश्न घेऊन लोहारा गावातील महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. पाणीपुरवठा सभापतींना घेराव घालून आपला रोष व्यक्त केला. नगर परिषदेच्या टँकरवर राजकीय बोर्ड बसे लागले हा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. मोफत पाणी विकत घ्यावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास वार्ड क्रमांक सहा मधील नागरिकांनी नगर परिषदेवर धडक दिली. यामध्ये द्वारकानगरी, तेलंगनगर, मौर्या अपार्टमेंट, रत्नदीपनगर, राधेयनगर, हर्षदीपनगर, पोलीस मित्र सोसायटी आदी भागातील महिलांचा समावेश होता. या भागात मागील दीड महिन्यांपासून पाण्याची भीषण स्थिती आहे. या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचे नळ नाही. विहीर आणि बोअरवेलचेच पाणी आधार आहे. आता हे स्रोत आटल्याने या भागाची तहान भागविण्यासाठी टँकरशिवाय पर्याय राहिला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेकडे वारंवार निवेदने दिली. पाणी टंचाईची भीषणता मांडली. यानंतरही नगर परिषदेचे टँकर पोहोचत नाही. हा प्रश्न नागरिकांनी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मुन्ना दुबे यांच्याकडे मांडला. नगरपरिषदेचे सहा टँकर लोहाऱ्यात सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर नागरिकांनी राजकीय पक्षाचे बॅनर लागलेले टँकर पालिकेचे आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला. टँकरवर पालिकेचे कर्मचारी दिसतात. मात्र त्यांच्या सांगण्यानूसार पाणीपुरवठा केला जात नाही. संबंधित भागातील राजकीय व्यक्तीच्या सांगण्यानुसार पाणीपुरवठा होतो, असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व लोहाऱ्याचे माजी सरपंच बबलू देशमुख यांनी केले. यावेळी नंदकिशोर गुल्हाने, सिकंदर शाह, अनिल मांगुळकर, रवी येनप्रेंटीवार, राहुल दारूंडे, हर्षल बोकडे, अक्षय थोटे, नीता गुज्जलवार, पुष्पा नरवाडे, सपना येनप्रेंटीवार, माया तांबे, सारिका वडे, उमा देव्हारे, मनीषा बुटे, अन्नपूर्णा पांडे, गीता जामनकर, वर्षा बोकडे, सुषमा मिश्रा, जयश्री मांगुळकर, वैशाली बलखंडे, अनिता माकोडे आदी सहभागी होते. (शहर वार्ताहर)