पंचायत समिती सदस्यांच्या तोंडाला कुलूप
By Admin | Updated: April 23, 2016 02:41 IST2016-04-23T02:41:08+5:302016-04-23T02:41:08+5:30
येथील पंचायत समितीच्या सभागृहात प्रत्येक महिन्याला होणाऱ्या मासिक सभेत दोन सदस्यांचा अपवाद वगळता इतर सदस्यांच्या तोंडाला कायम कुलूप असते.

पंचायत समिती सदस्यांच्या तोंडाला कुलूप
महागाव : येथील पंचायत समितीच्या सभागृहात प्रत्येक महिन्याला होणाऱ्या मासिक सभेत दोन सदस्यांचा अपवाद वगळता इतर सदस्यांच्या तोंडाला कायम कुलूप असते. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जात नाही. तर दुसरीकडे या सदस्यांमुळे पंचायत समितीचा निधीही परत गेला.
महागाव पंचायत समितीच्या सभागृहात केवळ दोन सदस्य वारंवार प्रश्न उपस्थित करतात इतर सदस्य काहीच बोलत नाही. सदस्यांच्या या वृत्तीचा फायदा घेत अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. शैक्षणिक आरोग्य, कृषी, समाजकल्याण, दलित वस्ती सुधार योजना, विशेष घटक योजना, धडक सिंचन विहीर योजना अखेरच्या घटका मोजत आहे. दलित वस्ती सुधार योजनेत जाणीवपूर्वक काम होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे. या योजनांचा निधी अखर्चित राहात असून, तो आर्थिक वर्ष संपल्यामुळे परत गेला आहे.
सभागृहात होणाऱ्या मासिक सभेच्या इतीवृत्तावर नजर टाकली तर दोन सदस्य वारंवार प्रश्न उपस्थित करतात. इतर सदस्यांना अपवादात्मक एखादा प्रश्न असतो, परंतु त्यालाही समाधानकारक उत्तर मिळत नाही. डिजीटल शाळांच्या नावाखाली ई-वर्गमधून जमा झालेली रक्कम मुख्याध्यापक खात्यातून वळती झाली आहे. एकीकडे डिजीटल शाळेचे फॅड वाढत असून, शाळा रंगविल्या जातात. शाळेत प्रोजेक्टरही आणल्या जातो. परंतु त्याच शाळेचे विद्यार्थी उघड्यावर शौचास जातात, हा प्रकार मात्र शिक्षकांना दिसत नाही. त्यावर पंचायत समिती सदस्यही बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे मासीक सभेचे प्रोसेडिंग कोणालाही लक्षात येणार नाही, अशाच पद्धतीने लिहिल्या जाते. सहा महिन्यातील मासीक सभेचे प्रोसेडिंग तपासले तर तीच ती आकडेवारी दिसून येते. विशेष म्हणजे इतीवृत्त कोणी वाचतही नाही. प्रोसेडिंगची होत असलेली थट्टा थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील विकास कामांनाही खीळ लागली आहे. सदस्य बोलत नसल्याने हे सर्व घडत आहे. (शहर प्रतिनिधी)