वीज कार्यालयाला दुसऱ्यांदा कुलूप ठोकले
By Admin | Updated: December 1, 2015 06:24 IST2015-12-01T06:24:03+5:302015-12-01T06:24:03+5:30
वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बोरीअरब येथील वीज वितरण कंपनीच्या

वीज कार्यालयाला दुसऱ्यांदा कुलूप ठोकले
बोरीअरब : वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बोरीअरब येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी दुपारी ३ वाजता कुलूप ठोकले. १५ दिवसात कुलूप ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे.
दारव्हा तालुक्यातील बोदगव्हाण येथील ट्रान्सफार्मर गत दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ओलित खोळंबले आहे. ट्रान्सफार्मर सुरू करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे वारंवार निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नाही. २७ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन डीपी न बसविल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावरून वीज वितरणचे अधिकारी बोदगव्हाण येथे पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली.
मात्र दुसऱ्या दिवशीही डीपी बंदच होती. या प्रकाराने संतप्त झालेले शेतकरी सोमवारी बोरीअरब येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडकले. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी या कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला. (वार्ताहर)