आमदारांना आढळले नांझा पीएचसीला कुलूप

By Admin | Updated: February 20, 2015 01:47 IST2015-02-20T01:47:12+5:302015-02-20T01:47:12+5:30

तालुक्यातील नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिलेल्या भेटीत आरोग्य केंद्राला चक्क कुलूप लाऊन असल्याचे आढळून आले.

Locked out Nanjha PHC to MLAs found | आमदारांना आढळले नांझा पीएचसीला कुलूप

आमदारांना आढळले नांझा पीएचसीला कुलूप

कळंब : तालुक्यातील नांझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंगळवारी आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिलेल्या भेटीत आरोग्य केंद्राला चक्क कुलूप लाऊन असल्याचे आढळून आले. हा संतापजनक प्रकार नेहमीचाच असल्याची माहीती नागरिकांनी आमदार डॉ.उईके यांना दिली. उल्लेखनिय म्हणजे याबाबत वारंवार केलेल्या तक्रारींची जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांकडून दखलच घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.संजय दुधे व डॉ.मंजुषा अचिंतलवार कार्यरत आहे. परंतु हे दोन्ही अधिकारी यवतमाळवरुन आपला कारभार पाहतात. तेच नाही तर इतर कर्मचारीही मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे कधीही रुग्णालय वेळेवर उघडले जात नाही. केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर रुग्णांना वाऱ्यावर सोडले जाते. एवढ्यावरच ही स्थिती थांबत नाही, तर रुग्णांना तुसडेपणाची वागणूक दिली जाते. औषधोपचार व मार्गदर्शन व्यवस्थित व वेळेवर केल्या जात नाही, आदी संबधीच्या तक्रारी येथील नागरिकांनी आमसभेमध्ये आमदार डॉ.उईके यांच्यापुढे केल्या होत्या. त्यानंतर संबधित वैद्यकीय अधिकारी यांना समज देण्यात आली. कारभार सुधारविण्यासंबधी सुचित करण्यात आले. परंतु या स्थितीमध्ये कुठलीही सुधारणा करण्यात आली नव्हती.
अशातच मंगळवारी आमदाराच्या आकस्मित भेटीत दवाखान्याला चक्क कुलूप होते. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. काही ठिकाणी विष्टाही करून ठेवण्यात आली होती. हा संतापजनक प्रकार पाहल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. स्वाईन फ्लुमुळे आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असताना येथील आरोग्य यंत्रणा मात्र अतिशय बेपर्वावृत्तीने वागत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच स्वच्छता अभियानाचा फज्जा उडविण्याचे कामही येथील केंद्रातून होत आहे. त्यामुळे संबधितावर कडक कारवाई करून रुग्णांची प्रामाणिक सेवा घडावी, यासाठी आमदार डॉ.अशोक उईके यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील भोंगळपणाचा प्रश्न केवळ जिल्ह्यातील वरिष्ठांपर्यंतच नव्हे तर आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन कायमस्वरुपी सोडवावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
समज दिल्यानंतरही सुधारणा नाही
येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी व बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णांना रुग्णसेवा वेळेवर मिळत नाही. तसेच इतर अनेक अनियमिततेमुळे संबधितांवर कारवाई करण्यासंबधीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. तसेच कारवाईसंबधी स्मरणपत्रही देण्यात आले. परंतु वरिष्ठ पातळीवरुन दोषींवर कुठलीही कारवाई झाली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी नागरिकांनी याबाबत आमसभेमध्ये आमदारांकडे या रुग्णालयाच्या कारभारासंदर्भात तक्रार केली होती, त्यानंतर रुग्णालयीन व्यवस्थापनाला समजही देण्यात आली होती. त्यानंतरसुद्धा रुग्णालयीन कामकाजात कोणतीही सुरधारणा करण्यात आली नव्हती, त्यामुळे हा प्रकार अतिशय गंभीर मानल्या जात आहे.

Web Title: Locked out Nanjha PHC to MLAs found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.