पांढरकवडा पोलिसांची लक्तरे वेशीवर

By Admin | Updated: June 2, 2017 01:49 IST2017-06-02T01:49:56+5:302017-06-02T01:49:56+5:30

पाटणबोरी येथील जुगार अड्ड्यावर यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बुधवारी धाड यशस्वी केल्याने पांढरकवडा पोलिसांच्या ...

Locked to the gates of Pandharvada police | पांढरकवडा पोलिसांची लक्तरे वेशीवर

पांढरकवडा पोलिसांची लक्तरे वेशीवर

पाटणबोरीत एलसीबीची धाड : मटका, जुगार, जनावरांची वाहतूक, गुटख्याचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पाटणबोरी येथील जुगार अड्ड्यावर यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बुधवारी धाड यशस्वी केल्याने पांढरकवडा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. पाटणबोरी, पिंपळखुटी परिसरातील जुगार मटका अड्ड्यांचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
महामार्ग आणि राज्य सीमेवर असलेल्या पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, कोंबडबाजार, प्रतिबंधित गुटखा तस्करी, जनावरांची चोरटी वाहतूक, गांजा तस्करी चालते. ही तस्करी रोखण्याचे आव्हान ठाणेदार असलम खान यांच्यापुढे आहे.
पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार चालतो. अनेकदा तेथे धाडी पडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तर पांढरकवडाच नव्हेतर एलसीबीची निष्क्रियता पाहून अमरावतीचे तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक विष्णुदेव मिश्रा यांच्या पथकाला पिंपळखुटीतील जुगारावर धाड घालावी लागली होती. हा परिसर कोंबडबाजारासाठीही सर्वश्रुत आहे. क्रिकेटच्या सट्ट्याचेही पांढरकवड्यात नेटवर्क आहे. हे अवैध धंद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आव्हान नवे ठाणेदार असलम खान यांच्यापुढे राहणार आहे. सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ते कशा पद्धतीने हाताळतात, यावरही बरेचकाही अवलंबून आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व नागपुरातून लगतच्या राज्यात कत्तलीसाठी जनावरे पाठविली जातात. त्याची वाहतूक रोखण्यात पांढरकवडा पोलीस कितपत यशस्वी होतात, याकडे लक्ष लागले आहे.
अलिकडेच बदली झालेले ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या काळातही अवैध धंद्यांचा धुमाकूळ सुरू होता. नवे ठाणेदार त्यांचाच कित्ता गिरवितात की, वेगळी वाट निवडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

असलम खान यांच्या नियुक्तीचे रहस्य कायम
असलम खान यांना पांढरकवडा ठाणेदार बनविण्यात आल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. कारण खान यांच्या विरोधात जनावर तस्करीला पाठबळ देतात म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक तक्रारी प्रशासनासह आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे केल्या होत्या. असे असताना त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्याऐवजी भाजपाच्या ‘मतदारसंघात’ पांढरकवड्याला नियुक्ती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Locked to the gates of Pandharvada police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.