लिव इन रिलेशनशिपचा पर्दाफाश
By Admin | Updated: May 7, 2015 05:46 IST2015-05-07T01:48:52+5:302015-05-07T05:46:05+5:30
महाराष्ट्राची राजधानी मुंबई या मायानगरीत अनेक लोक लिव इन रिलेशनशिप व बिफोर मॅरेज पद्धतीने राहतात.

लिव इन रिलेशनशिपचा पर्दाफाश
किशोर वंजारी नेर
महाराष्ट्राची राजधानी मुंबई या मायानगरीत अनेक लोक लिव इन रिलेशनशिप व बिफोर मॅरेज पद्धतीने राहतात. कुणी हे संबंध अखेरपर्यंत ठेवतात, तर कुणी संपुष्टात आणतात. मात्र येथे एका दूरचित्रवाहिनीवरील कलावंतांचा लिव इन रिलेशनशिपचा पर्दाफाश झाला. या प्रकारात मात्र एका वधूच्या स्वप्नाचा चुराडा झाला. ओडिसा टू मुंबई-नेरची ही लव्हस्टोरी प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.
नेर येथील एक तरुण गेल्या १० वर्षांपासून मुंबई या मायानगरीत एका विनोदी मालिकेत कलावंत म्हणून काम करतो. हे काम करीत असताना ओडिसामधून काम शोधायला आलेल्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. हे संबंध इतके जवळ आले की, दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. सदर तरुणाने तिला एका मोबाईल कंपनीत नोकरीला लावले.
गतवर्षी सदर तरुण नेर येथील घरी आला. मात्र आपण लिव इन रिलेशनशिपमध्ये एका तरुणीसोबत मुंबईला राहतो, ही बाब आपल्या परिवारापासून लपविली. मुंबईत आपला मुलगा एकटा राहतो, त्याचे खाण्यापिण्याचे हाल होत असेल, या विचाराने कुटुंंबाने त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली. गावातील एका युवतीशी लग्न जुळवून साक्षगंध आटोपले. विवाह सोहळा ५ मे रोजी एका मंगल कार्यालयात होता. दरम्यान, विवाहाची पत्रिका सदर तरुणाच्या एका मित्राच्या हाती लागली. ही बाब त्याने ‘त्या’ तरुणीला सांगितली. विवाह पत्रिका पाहताच तरुणी संतापली. ज्याच्यावर विश्वास टाकला, त्यानेच दगा दिला. विश्वासघात झाल्याने तरुणाच्या लिव इन रिलेशनशिपचा पर्दाफाश करण्यासाठी तरुणी नेरमध्ये दाखल झाली. तरुणासोबत विवाहबध्द होत असलेल्या उपवधूचा शोध लावला. तरुणाशी असलेल्या संबंधाचा भंडाफोड तिने केला. एवढेच नाही तर पोटातील गर्भही त्याचाच असल्याचे सांगितले. यामुळे वधूकडील मंडळी सैरभर झाली.
इकडे सदर तरुण नवरदेव बनून तयार होता. त्या ठिकाणी ही तरुणी पोहोचली. ‘माझ्याशी संबंध असताना मंडपात बसलाच कशाला’ आदी प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर केली. त्याचवेळी तरुणाने लिव्ह इन रिलेशनशिपची कबुली देऊन तरुणीला घेऊन मुंबईला प्रस्थान केले.
एखाद्या चित्रपटातील कथानकासारखा हा प्रसंग सध्या नेर शहरातील नागरिकांसाठी चर्चेचा विषय झाला आहे. मात्र यात सदर वधूचा काय दोष. तिच्या स्वप्नांचा मात्र चुराडा झाला आहे.