लाभार्थ्यांची यादी दर्शनी भागावर लावा
By Admin | Updated: June 22, 2015 02:05 IST2015-06-22T02:05:59+5:302015-06-22T02:05:59+5:30
ग्रामपंचायतीमार्फत अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. बहुतेक वेळा या योजनांचा लाभ मिळवून देतो म्हणून पैसे उकळणारेही असतात,

लाभार्थ्यांची यादी दर्शनी भागावर लावा
सीईओ : आढावा बैठक, सर्व ग्रामपंचायतींना प्लास्टिक बंदी ठराव घेण्याचे निर्देश
कळंब : ग्रामपंचायतीमार्फत अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. बहुतेक वेळा या योजनांचा लाभ मिळवून देतो म्हणून पैसे उकळणारेही असतात, अशा लोकांपासून कुणाचीही फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येक योजनेतील लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
ते शुक्रवारी कळंब येथे विविध विकासकामांचा आढावा घेताना बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या विहिरींचे कामे ताबडतोब पूर्ण झाले पाहिजे. विहिरींच्या कामांसाठी ग्रामसेवकांनी जातीने प्राधान्य द्यावे. विहीर पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन तत्काळ देण्यात येणार आहे. तसेच विहीरच नाही तर इतर लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादीही ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. घरकुल बांधकामाची स्थिती, संग्राम विभागाची माहिती, वृक्ष लागवड आदीं कामांचाही त्यांनी आढावा घेतला.
किती ग्रामपंचायतींच्या मासिक सभा आॅनलाईन करण्यात आल्या, नियमित ग्रामसभा घेतल्या जातात की नाही, विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारी पाठ्यपुस्तके मिळाली की नाही, याचीही माहिती त्यांनी घेतली. तालुक्यात शेतकऱ्यांनी किती टक्के पेरणी केली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोफत शेती साहित्य मिळाले की नाही आदी आवश्यक बाबींचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
या आढावा बैठकीला गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, गटशिक्षणाधिकारी गणेश गायनर, शाखा अभियंता तुषार परळीकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, कृषी विस्तार अधिकारी पंकज बरडे, रमेश केळकर, अशोक ठाकरे, राजेश साव, रतनलाल अग्रहरी, अनुराधा ठाकरे, मंगेश आंधळे, संजय दहेकर, पी.जी. निंबोकार, के.जी. खैरकार, एस.एल. ढोमणे, सुनील ताटेवार, पी.व्ही. रामटेके, दीपिका धोपटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)