शासकीय रुग्णालयात तिघांना जीवदान
By Admin | Updated: September 12, 2016 01:44 IST2016-09-12T01:44:00+5:302016-09-12T01:44:00+5:30
डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यात सर्पदंशाच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत.

शासकीय रुग्णालयात तिघांना जीवदान
सर्पदंश झाल्याने २४ तास झुंज : दोन डॉक्टर बनले रुग्णांसाठी देवदूत
उमरखेड : डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यात सर्पदंशाच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत. मात्र येथील शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाने सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवदान मिळत आहे. दोन दिवसापूर्वी तिघांना सर्पदंश झाला होता. या तिघांवर वेळीच योग्य उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. दोन डॉक्टर या तिघांसाठी देवदूत ठरले.
उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून सर्पदंश झालेल्या रुग्णांवर खात्रीने उपचार होत आहे. त्यामुळे सर्पदंश झाला की, ग्रामीण भागातील नागरिक थेट शासकीय रुग्णालय गाठतात. त्या ठिकाणी असलेले डॉ.श्रीकांत जयस्वाल आणि शेख मोहंमद गौस हे उपलब्ध साधन सामुग्रीतून रुग्णांवर उपचार करतात. १५ दिवसापूर्वी पळशी येथील शिल्पा जोगदंडे आणि साखरा येथील सिंपल बडवे या दोघींना डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा सर्पदंशानंतर गावठी उपचार करण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात जाण्याकडे कल वाढला.
अशातच दोन दिवसापूर्वी उमरखेड तालुक्यातील हातला येथील निवृत्ती विठ्ठल ढोले या शेतकऱ्याला शेतात सर्पदंश झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर शर्तीने उपचार केले. उपचार सुरू असतानाच गाजेगाव येथील गोविंद मस्के या ३० वर्षीय तरुणाला सर्पदंश झाल्याने रुग्णालयात दाखल केले. त्या पाठोपाठ चिल्ली येथील अर्जुन आत्माराम राठोड याही सर्पदंशाचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. एकाच वेळी तीन रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना मोठे परिश्रम घ्यावे लागले.
सतत २४ तास या तिघांवर निगरानी ठेऊन उपचार करण्यात आले. यासाठी परिचारिका शीतल बोडगे, तेजल बोडगे, शिवा सावळे, त्रिनेत्रा स्वामी, मोगलाजी जोरगेवार यांनी सहकार्य केले. या तिघाही रुग्णांची प्रकृती आता ठणठणीत झाली आहे.
सर्पदंशावर खात्रीशीर उपचार
शासकीय रुग्णालयाकडे पाहण्याचा दृष्टीकोण तसा वेगळा असतो. परंतु डॉ. श्रीकांत जयस्वाल यांनी गत दोन वर्षात सर्पदंश झालेल्या शेकडो रुग्णांना जीवदान दिले. त्यामुळे उमरखेड तालुक्यात डॉ. जयस्वाल यांच्याकडे सर्पदंशावरील उपचाराचे तज्ज्ञ म्हणूनच बघितले जाते. ग्रामीण भागातील जनताही आता अंधश्रद्धेच्या आहारी न जाता थेट रुग्णालयात येतात. या ठिकाणी उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन जातात. (शहर प्रतिनिधी)