शिक्षणासाठी जीव धोक्यात
By Admin | Updated: December 20, 2014 22:46 IST2014-12-20T22:46:04+5:302014-12-20T22:46:04+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील

शिक्षणासाठी जीव धोक्यात
खासगी वाहनाने प्रवास : अनेक गावांत एसटी बसची फेरीच नाही
देवानंद पुजारी - फुलसावंगी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील गावातील विद्यार्थी फुलसावंगी आणि टेंभी येथे शिक्षणासाठी खासगी वाहनाने येतात. अनेकदा या विद्यार्थ्यांना पायदान आणि टपावरून प्रवास करावा लागतो.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी आणि टेंभी येथे माध्यमिक शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. परंतु घरापासून शाळेपर्यंत येण्यासाठी एसटी बसची कोणतीही फेरी नाही. त्यामुळे चिल्लीसह अनेक गावातील विद्यार्थी चक्क खासगी वाहनाने प्रवास करतात. अनेकदा या वाहनांमध्ये जागा नसल्याने विद्यार्थी वाहनाच्या मागण्या बाजूला लटकून तर अनेकदा टपावर बसून प्रवास करताना दिसून येतात. विशेष म्हणजे महागाव-फुलसावंगी, फुलसावंगी-निगनूर आणि फुलसावंगी किनवट या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहे. अशा रस्त्यावरून विद्यार्थी केवळ शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करताना दिसतात. आॅटोरिक्षामध्ये अथवा जीपमध्ये बसण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. त्यावेळी या विद्यार्थ्यांना लटकून प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत अपघाताची भीती नाकारता येत नाही. परंतु शिक्षणासाठी हा धोका हे चिमुकले घेत असल्याचे चित्र आहे.
शहरी भागातील विद्यार्थ्यांना दारापासून शाळेपर्यंत वाहनाची व्यवस्था केली जाते. सर्व सुविधा दिल्या जातात. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी खडतर प्रवास करावा लागत असल्याचे चित्र फुलसावंगी परिसरात दिसून येते. अनेकदा या वाहनांमुळे अपघात होतात. लहान-मोठ्या अपघाताकडे कुणी लक्षही देत नाही. महागाव पोलिसांना हा प्रकार माहीत आहे. परंतु बसच नसल्याने विद्यार्थी जाणार तरी कसे, असा प्रश्न करीत तेही या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे अनेक आॅटोरिक्षांचे चालक हे अप्रशिक्षित असतात. लायसनही नसते. मात्र विद्यार्थी अशा वाहनातून प्रवास करताना दिसून येतात.
राज्य परिवहन महामंडळाने अनेक मार्गावरील आपल्या बसफेऱ्या कमी केल्या आहे. बसफेऱ्या कमी करताना उत्पन्न आणि रस्ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले जाते. याच कारणाने महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अशा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो.