विवाहितेच्या खुनात जन्मठेप
By Admin | Updated: January 27, 2015 23:40 IST2015-01-27T23:40:40+5:302015-01-27T23:40:40+5:30
एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न देणाऱ्या विवाहितेचा खून केल्याचे सिध्द झाल्याने पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डोरले यांनी वणी तालुक्याच्या मूर्ती येथील प्रकाश गजानन गोहोकार

विवाहितेच्या खुनात जन्मठेप
निकाल : टॉवेलच्या साहाय्याने आरोपीचा माग
पांढरकवडा : एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न देणाऱ्या विवाहितेचा खून केल्याचे सिध्द झाल्याने पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डोरले यांनी वणी तालुक्याच्या मूर्ती येथील प्रकाश गजानन गोहोकार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना साडेतीन वर्षांपूर्वी घडली होती.
२४ आॅक्टोबर २0११ रोजी प्रकाश गोहोकार याने ग्राम मूर्ती येथील विवाहिता संगिता विलास बोंडे हिची हत्या केली होती. त्याची संगितावर वाईट नजर होती. तिची तो छेडखानी करीत होता. याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली होती. तरीही प्रकाशने तिचा पिच्छा सोडला नाही. २४ आॅक्टोबर २०११ रोजी सकाळी ११.३0 वाजता संगीता कापूस वेचण्याकरिता पांदण रस्त्याने शेतात जात असताना प्रकाशने वाटेत तिला अडविले. त्याने पुन्हा आपल्या प्रेमाची तिच्याकडे वाच्यता केली.
मात्र त्याच्या या एकतर्फी प्रेमाला संगीताने स्पष्ट नकार दर्शविला. त्यामुळे चिडून जाऊन प्रकाशने संगिताच्या पोटावर धारदार चाकूने वार केले. तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी मृतकचा पती विलास बोंडे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. तत्कालीन ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी या गुन्ह्याचा तपास केला. या घटनेतील आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र घटनास्थळी आढळलेल्या एका टॉवेलवरून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. महिनाभरानंतर आदिलाबाद रेल्वेस्थानकावरून प्रकाशला अटक करण्यात आली. न्या. डोरले यांच्या न्यायालयात हा खटला चालला. खटल्यात ११ साक्षीदार तपासण्यात आले.
त्यातील काही साक्षदार आता मृत्यू पावले आहेत. न्या. डोरले यांनी आरोपी प्रकाशला भादंवि कलम ३०२ नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याला दोन हजार रूपये दंडही ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास सुनावला. सरकारी पक्षातर्फे अॅड.प्र.अ.मानकर यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)