चुलत भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: May 19, 2016 02:03 IST2016-05-19T02:03:50+5:302016-05-19T02:03:50+5:30
वणी तालुक्यातील खांदला येथे शेतीच्या वादात चुलत भावाचा धारदार सुऱ्याने खून करणाऱ्यास येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

चुलत भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप
पांढरकवडा सत्र न्यायालय : शेतीचा वाद
पांढरकवडा : वणी तालुक्यातील खांदला येथे शेतीच्या वादात चुलत भावाचा धारदार सुऱ्याने खून करणाऱ्यास येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
मारूती आनंद तोडासे (४०) रा. खांदला ता. वणी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत खांदला येथे २३ डिसेंबर २०१३ रोजी राजू बबन तोडासे याचा पोटावर धारदार सुऱ्याने वार करून खून करण्यात आला होता. मारूतीचा काका वारलू भीमा तोडासे यांना मूलबाळ नसल्याने राजू कुर्ली येथे राहून शेती वाहत होता. मात्र आरोपी मारूती हा नेहमी काकाकडे शेतीची मागणी करीत होता.
यावरूनच काका आणि राजूसोबत मारूतीचा वाद होत होता. अनेकदा त्याने जीवे मारण्याची धमकीही दिली होती. घटनेच्या दिवशी गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेत मारूतीने सुऱ्याने वार करून राजूचा निर्घृण खून केला. या प्रकरणी बबन तोडासे यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात यात खटल्यात १६ साक्षीदार तपासण्यात आले.
साक्ष आणि सरकारी वकिलाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्या. एस.पी. डोरले यांनी आरोपी मारोतीला जन्मठेपेची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)