खुनात पिता-पुत्रांसह चौघांना जन्मठेप
By Admin | Updated: September 30, 2014 23:41 IST2014-09-30T23:41:37+5:302014-09-30T23:41:37+5:30
पोटावर चाकूचे वार करून तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शहरातील टिळकवाडी परिसरात ही घटना २० जून २०११ रोजी घडली होती.

खुनात पिता-पुत्रांसह चौघांना जन्मठेप
दारव्हा : पोटावर चाकूचे वार करून तरुणाचा खून करणाऱ्या चौघांना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शहरातील टिळकवाडी परिसरात ही घटना २० जून २०११ रोजी घडली होती.
सतीश रमेश शेळके (२६), रमेश शेळके (५२), संतोष रमेश शेळके (२९) आणि दीपक ठाकरे सर्व रा.टिळकवाडी परिसर दारव्हा अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे तर नरेश मधुकर शिंदे (३५) रा.टिळकवाडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते. नरेश शिंदे आणि या प्रकरणातील आरोपी घटनेच्या एक वर्ष आधी घाटंजी येथील जिनिंगवर कामाला होते. तेथून दारव्हा येथे परत आल्यावर एकाच परिसरात राहात होते. शेळके आणि शिंदे यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादात नरेशने सतीश शेळके याच्यावर चाकूने हल्ला केला आणि पसार झाला. यातून आरोपींच्या मनात नरेशबद्दल राग खदखदत होता. घटनेच्या दिवशी नरेश घरी आल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यामुळे या चौघांनीही नरेशच्या घरात शिरून त्याला मारहाण केली. यात नरेशच्या पोटावर चाकूचे वार केले. त्यात नरेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात आठ जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. सरकारी वकील अविनाश शेटे यांनी युक्तिवाद केला. खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने चौघांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (शहर प्रतिनिधी)