२४ वर्षे फरार आरोपीला जन्मठेप
By Admin | Updated: May 31, 2017 00:32 IST2017-05-31T00:32:10+5:302017-05-31T00:32:10+5:30
कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे सासऱ्याने साडभावाला शेती घेऊन दिल्याच्या रागातून आरोपीने जून १९९२ मध्ये साडभावाचा

२४ वर्षे फरार आरोपीला जन्मठेप
साडभावाचा खून : डोंगरखर्डात १९९२ ची घटना, २०१६ ला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे सासऱ्याने साडभावाला शेती घेऊन दिल्याच्या रागातून आरोपीने जून १९९२ मध्ये साडभावाचा शेतातच खून केला होता. यानंतर आरोपी तब्बल २४ वर्षे फरार होता. जिल्हा न्यायालयाने त्याला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
सुभाष श्रीधर राणे (५५) रा. भीमनगर वर्धा, असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. डोंगरखर्डा येथे गणेश विश्वेश्वर डोहीये (३५) यांनी २० एकर शेत जमीन खरेदी केली होती. डोहीये परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. आरोपी सुभाष राणे हा डोहीये यांचा सख्खा साडभाऊ आहे. त्याने या शेतीवरून गणेश डोहीये यांना जीवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. ही शेती त्यांना सासऱ्यानेच घेऊन दिली, असा त्याचा समज होता. अखेर २४ जून १९९२ रोजी दुपारी २ वाजता डोहीये डोंगरखर्डा शेतशिवारात असताना आरोपी राणे याने त्यांच्यावर हल्ला केला. गुप्तीने छातीत व पोटावर वार केले. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गणेश डोहीये यांच्या मृत्यूपूर्व जबानीवरून कळंब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरूण झलकारिया यांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र आरोपी सुभाष राणे पसार असल्याने न्यायालयात दोषारोपपत्र सादर करता आले नाही. शेवटी पोलीस उपनिरीक्षक रमेश मगर यांनी त्याला २०१६ मध्ये अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी या खटल्यात तब्बल १२ साक्षीदार तपासले. यात मृतकाची पत्नी अल्का, दोन प्रत्यक्षदर्शी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून ए.एस. देशमुख व अॅड़ संदीप दर्डा यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार दत्तात्रय मेश्राम यांनी त्यांना सहकार्य केले.