जिल्हा परिषदेत आढळले ७३ कर्मचारी लेटलतिफ
By Admin | Updated: December 8, 2014 22:39 IST2014-12-08T22:39:52+5:302014-12-08T22:39:52+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षांनी १०.१५ वाजता अचानक जिल्हा परिषदेची झाडाझडती घेतली. तेव्हा एक-दोन नव्हे तर तब्बल ७३ कर्मचारी लेटलतिफ आढळून आले. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच ही अवस्था असेल

जिल्हा परिषदेत आढळले ७३ कर्मचारी लेटलतिफ
यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्षांनी १०.१५ वाजता अचानक जिल्हा परिषदेची झाडाझडती घेतली. तेव्हा एक-दोन नव्हे तर तब्बल ७३ कर्मचारी लेटलतिफ आढळून आले. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच ही अवस्था असेल तर इतर दिवसांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या लेटलतिफांना शो-कॉज नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी दिले आहे.
कर्मचारी जागेवर मिळत नाही ही नेहमीचीच तक्रार आहे. येथील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने प्रत्येकांची काम करण्याची पद्धत मनमर्जीने सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी स्वत:च आढावा घेणे सुरू केले आहे. त्यांनी सोमवारी सकाळी वित्त विभागापासून झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. यात वित्त विभागातील १७ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागात ९, पंचायत विभागात दहा, शिक्षण विभागात १३, पाणी पुरवठा विभागात पाच, बांधकाम विभागात ११ आणि सिंचन विभागात आठ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन का कापण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावल्या जावी, शिवाय या पुढे नियमित वेळेवर कार्यालयात उपस्थित राहील, अशी हमीही त्यांच्याकडून घ्यावी, असे निर्देश अध्यक्ष डॉ. फुफाटे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांना दिल्या आहे. अध्यक्षांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे कर्मचारी वर्गात चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. यापूर्वी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना तंबी देऊन सोडण्यात आले होते. मात्र त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्यामुळे आता कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. या पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असेही डॉ. आरती फुफाटे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)