परवानाधारक हमाल-मापाऱ्यांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST2020-03-04T05:00:00+5:302020-03-04T05:00:17+5:30
प्रक्रियेसोबतच तूर खरेदीही नाफेडमार्फत सुरू होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी सुरू होणार आहे. मात्र या प्रक्रियेत परवानाधारक हमाल आणि मापाऱ्याना घ्यायचे नाही, अशी खेळी काही ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही बाजार समित्यांमध्ये परवानाधारक हमाल-मापाऱ्यांमार्फतच तुरीचे मोजमाप व्हावे, यासाठी आग्रह धरला जात आहे.

परवानाधारक हमाल-मापाऱ्यांना डावलले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परवानाधारक हमाल आणि मापाऱ्यांना तूर खरेदीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यापाऱ्याची ही खेळी यशस्वी झाल्यास तूर उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. सहकार विभागाने यात आताच हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्याची तूर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसोबतच तूर खरेदीही नाफेडमार्फत सुरू होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी सुरू होणार आहे. मात्र या प्रक्रियेत परवानाधारक हमाल आणि मापाऱ्याना घ्यायचे नाही, अशी खेळी काही ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही बाजार समित्यांमध्ये परवानाधारक हमाल-मापाऱ्यांमार्फतच तुरीचे मोजमाप व्हावे, यासाठी आग्रह धरला जात आहे.
व्यापाऱ्यांकडून त्यांचे हित पाहणारे हमाल-मापारी ठेवले जातात, अशी ओरड आहे. वजनात दांडी मारली जाते. हलका-भारी अशी प्रतवारी करून दरात लुबाडणूक होते, अशी ओरड शेतकऱ्यांमधून होते. हिच खेळी व्यापाºयांकडून खेळली जाते. परवानाधारक हमाल आणि मापारी ठेवल्यास निरीक्षकांच्या उपस्थितीत शेतमालाचे मोजमाप केले जाते. शेतमालाचे वजन झाल्यानंतर पावती तयार करण्यात येते.
निरीक्षक, शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती यांच्याकडे या पावत्या सोपविल्या जातात. शेतकऱ्याला काही संशय आल्यास तो दाद मागू शकतो. व्यापाऱ्यांच्या हमालांकडून काहीही नुकसान झाले तरी, दाद मागण्याची काहीही सोय नाही. हीच बाब शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी परवानाधारक हमाल-मापारीच असावे, असा आग्रह धरला जात आहे.
नाफेड, सीसीआय, व्यापारी यापैकी कुणीही शेतमाल खरेदी करो. मोजमाप करण्यासाठी परवानाधारकच हमाल-मापारी असले पाहिजे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तशी तरतूद कायद्यातही करण्यात आली आहे.
- अरविंद देशमुख,
अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा हमाल, मापारी कामगार संघटना