चलो किसी बच्चे को हसाया जाएं..!
By Admin | Updated: August 30, 2015 02:11 IST2015-08-30T02:11:14+5:302015-08-30T02:11:14+5:30
वाट्टेल ती किंमत मोजून ‘एन्जॉय’ करण्याची जणू सध्या पैजच लागली आहे. पण ओरबाडल्याने सुख मिळते का?

चलो किसी बच्चे को हसाया जाएं..!
दातृत्वाचा सोहळा : मतिमंद मुलांना अशीही सप्रेम भेट
लोकमत प्रेरणावाट
यवतमाळ : वाट्टेल ती किंमत मोजून ‘एन्जॉय’ करण्याची जणू सध्या पैजच लागली आहे. पण ओरबाडल्याने सुख मिळते का? उलट आपल्याकडे जे काही आहे, ते गरजूंना वाटून दिले की, हवा तेवढा आनंद आपल्या पदरात आपसूकच येऊन पडतो. गणेश दाढे नावाच्या गृहस्थाने तेच केले. आपला मुलगा कायमचा हरपल्याची बोच काळजात लपवून त्यांनी इतर गरजू मुलांना सुविधा उपलब्ध करून दिली. म्हणूनच एक मुलगा गमावल्यानंतरही त्यांच्या भोवती मुलांचा मोहक विळखा कायम राहिला!
बाप-लेकाच्या नात्यातला जिव्हाळा अधिक दृढ करणारा हा प्रसंग विशालनगरातील मतिमंदांच्या निवासी शाळेत शुक्रवारी घडला. मुलगा रुपेश याचे निधन झाल्यानंतर गणेश दाढे अगदीच एकाकी पडले. वर्षभरापूर्वीच मुलगा गेला, हे दु:ख कोणता पिता इतक्या सहज विसरणार? गणेश दाढे यांच्या काळजालाही ही सल सतत टोचतच होती. पण केवळ मुलासाठी कुढत बसण्यापेक्षा समाजातील इतर मुलांना हसविण्याचा प्रयत्न केला तर..!
घर से मस्जीद है बहोत दूर
किसी रोते हुए बच्चे को हसाया जाएं
गणेश दाढेंनीही हाच विचार केला. त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि ते कामाला लागले. मुलाच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मतिमंद मुलांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा तो विचार होता. जीवन विकास मंदिर ही मतिमंद मुलांची निवासी शाळा त्यांनी गाठली. या मुलांच्या सोयीसाठी त्यांनी तब्बल २४ लोखंडी कॉट सप्रेम भेट दिल्या. मतिमंद मुलांना स्वत:हून हालचाल करणे कठीण जाते. अशा वेळी त्यांना जमिनीवरून वर उचलण्यासाठी या कॉट मोठ्या उपयोगी ठरतात.
चांगले काम घडले, त्यातून आणखी काही तरी चांगले घडतेच. गणेश दाढे यांच्या दातृत्वाचा प्रसंग पाहणाऱ्या डॉ. संदीप धवने यांनीही मतिमंदांना काही तरी देण्याचे ठरवले. त्यांनी मग या निवासी शाळेला एक्झॉस्ट पंखे दिले. निवासी शाळेत सतत खेळती हवा राहण्यासाठी या पंख्यांची मदत होणार आहे. जीवनात येणे आणि जाणे कुणाला चुकले? पण जीवनात इतरांसाठी फुल ना फुलाची पाकळी तरी आपण देऊ शकलो, हे समाधान अनेकांचे आयुष्य वाढवित असते. त्यातून घेणाऱ्याला मिळणाऱ्या सुखापेक्षाही देणाऱ्याला मिळणारा आनंद अमूल्य असतो. मतिमंदांना मदत करणाऱ्या दाढे आणि धवने या गृहस्थांच्या वाट्याला असाच आनंद आलाय... (स्थानिक प्रतिनिधी)