विधानपरिषद लढायचीच !
By Admin | Updated: October 14, 2016 02:58 IST2016-10-14T02:58:29+5:302016-10-14T02:58:29+5:30
जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे.

विधानपरिषद लढायचीच !
एकमुखी ठराव : काँग्रेसच्या बैठकीत मांडले विजयाचे गणित
यवतमाळ : जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसनेच विधानपरिषदेची निवडणूक लढावी, असा एकमुखी ठराव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारी, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापतींची बैठक झाली.
काँग्रेसकडे विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे संख्याबळ असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करणे चुकीचे आहे. विधानपरिषदेच्या जागा वाटपात यवतमाळची जागा काँग्रेसलाच मागावी, अशी आग्रही भूमिका नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी या बैठकीत मांडली. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक घेण्यात आली. बैठकीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे माजी उपसभापती वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, निरीक्षक श्याम उमाळकर यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत उपस्थित सर्वच सदस्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी सदस्यांच्यावतीने आर्णीचे नगराध्यक्ष आरिज बेग यांनी ठराव मांडला. याला उपस्थित सदस्य व नेते मंडळींनी सहमती दर्शविली. जिल्ह्यातून कोणत्याही परिस्थितीत शिवीगाळीची भाषा हद्दपार झाली पाहिजे. विधानपरिषदेसाठी नेत्यांनीसुद्धा एकत्र यावे, अशी विनंती सदस्यांनी केली. आज काँग्रेसकडे स्थानिक स्वराज्य संस्थेत १५४ सदस्य आहेत आणि महागावच्या नऊ सदस्यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील यवतमाळची जागा काँग्रेसनेच कोणत्याही परिस्थितीत लढवावी, असा निर्णय घेण्यात आला. आघाडीत जागेच्या वाटाघाटीत यवतमाळची जागा राष्ट्रवादीला सुटल्यानंतरही काँग्रेसने येथे उमेदवार द्यावा, असाही ठराव या बैठकीत घेण्यात आला. याला नेते मंडळींनी तत्त्वत: मान्यता दिली. उमेदवारी मागणाऱ्यांमध्ये जीवन पाटील, शंकर बडे, नरेंद्र ठाकरे, इस्राईल शेठ, डॉ. वजाहत मिर्झा, संध्याताई सव्वालाखे, योगेश पारवेकर यांचा समावेश आहे. यापैकी एकाचे नाव निश्चित करून प्रदेश काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी मागण्यात येईल, असे माणिकराव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. त्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके आणि पक्षाचे निरीक्षक श्याम उमाळकर यांच्या समितीने हे नाव निश्चित करून प्रदेशकडे पाठवावे, अशी सूचना माणिकराव ठाकरे यांनी केली. विधानपरिषदेसंदर्भात १५ आॅक्टोबरला मुंबईत प्रदेश काँगे्रसने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत यवतमाळच्या जागेबाबत भूमिका मांडणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, माजी आमदार नंदिनी पारवेकर, माजी आमदार विजयाताई धोटे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुनील भेले, प्रफुल्ल मानकर, अरुण राऊत आदींसह काँग्रेसची नेतेमंडळी उपस्थित होती. (कार्यालय प्रतिनिधी)