घर सोडून गेला अन् कारागृहात अडकला

By Admin | Updated: June 4, 2015 02:06 IST2015-06-04T02:06:42+5:302015-06-04T02:06:42+5:30

यवतमाळातील तरुणाला केवळ वाईट संगतीने तरुणीच्या खुनात थेट जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो नागपूरच्या कारागृहात पोहोचला.

Left the house and got trapped in jail | घर सोडून गेला अन् कारागृहात अडकला

घर सोडून गेला अन् कारागृहात अडकला

वाईट संगतीचा परिणाम : यवतमाळच्या भुऱ्याला नागपुरात जन्मठेप
यवतमाळ : यवतमाळातील तरुणाला केवळ वाईट संगतीने तरुणीच्या खुनात थेट जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो नागपूरच्या कारागृहात पोहोचला.
नागपूरातील बहुचर्चित मोनिका किरणापुरे या विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणात उमेश ऊर्फ भुऱ्या मोहन मराठे (२४) रा.रोहिदासनगर, यवतमाळ याचा सहभाग निष्पन्न झाला. मंगळवारी नागपूर सत्र न्यायालयाने त्याच्यासह चौघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि यवतमाळातील गुन्हेगारी वर्तुळ विदर्भात पुन्हा चर्चेत आले. त्या पार्श्वभूमीवर भुऱ्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली असता वाईट संगतीने त्याचा कसा घात केला, याचे वास्तव पुढे आले. कुटुंबीयांनी सांगितले की, भुऱ्या हा पाचवा वर्ग शिकला आहे. तो येथे कधी कॅन्टीनवर तर कधी मजुरीचे काम करायचा. सन २०१० मध्ये तो काकाशी भांडण झाल्याने घर सोडून तो नागपुरात गेला. तेथे त्याची भेट नातेवाईक असलेल्या श्रीकांत सोनेकर (२७) रा.हुडकेश्वर राजापेठ याच्याशी झाली. त्याच्याच माध्यमातून भुऱ्याने तेथे आईस्क्रिम विक्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र श्रीकांतच्या या आश्रयानेच भुऱ्याचा घात केला. ११ मार्च २०११ रोजी नागपुरात मोनिका किरणापुरे हिचे खूनप्रकरण घडले. त्यानंतर भुऱ्या यवतमाळात आला. मात्र त्याने गुन्हा केल्याची साधी कुणकुणही कुणाला लागू दिली नाही. मात्र काही दिवसांनी त्याचे नाव मोनिकाच्या खूनप्रकरणात वृत्तपत्रातून झळकले. परंतु त्यानंतरही तो कुठे पळून गेला नाही. नागपूर पोलिसांनी यवतमाळात येऊन भुऱ्याला अटक केली. वास्तविक भुऱ्याची अथवा त्याच्या परिवाराची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो प्रचंड भित्रा असल्याचे व शेजारी भांडण झाल्यास तोच आधी घरात लपायचा, असे कुटुंबीयांनी सांगितले. नागपूरवरून परत आल्यानंतर मात्र भुऱ्या प्रचंड खूष दिसत होता. त्याच्या त्या खुषीमागे आर्थिक गणित असावे, असा कयास आता कुटुंबीय लावत आहे. विशेष असे, भुऱ्या नागपुरातील घटनेनंतर यवतमाळात आला असता त्याचा साखरपुडा केला गेला. मात्र त्यानंतर त्याचे नाव मोनिकाच्या खुनात पुढे येताच त्याचे हे नियोजित लग्न तुटले. नागपूर कारागृहात असताना परिवारातील सदस्य अनेकदा त्याच्या भेटीला गेले होते. मात्र मी लवकर परत येतो, चिंता करू नका, एवढेच तो कुटुंबीयांना सांगत होता. परंतु न्यायालयाने जन्मठेप सुनावल्याने कुटुंबीयांची भुऱ्या घरी येण्याची आशा मावळली आहे. वाईट संगतीनेच भुऱ्याचा घात केल्याची बाब त्याच्या कुटुंबीयांनीही कबूल केली.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Left the house and got trapped in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.