सिंचनासाठी बेंबळाचे पाणी सोडणार
By Admin | Updated: November 15, 2014 02:12 IST2014-11-15T02:12:40+5:302014-11-15T02:12:40+5:30
खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे.

सिंचनासाठी बेंबळाचे पाणी सोडणार
यवतमाळ : खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे. मात्र कालवे आणि पटचऱ्यांच्या दुरावस्थेने पूर्ण क्षमतेने सिंचनावर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता आहे.
सुरूवातीला पावसाने संपूर्ण जिल्ह्यातच दडी मारली. त्यामुळे दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर वातावरणातील बदलाने सोयाबीन आणि कपाशीचे पीक हातून गेले. हिच परिस्थिती बाभूळगाव तालुक्याचीही आहे. खरीप हातून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने यंदा बेंबळा प्रकल्पावरून रब्बी हंगामासाठी आठ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सहा टप्प्यांमध्ये ६८ किलोमीटर पर्यंत सिंचनासाठी पाणी पोहोचविले जाणार आहे. १ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी स्थानिक बेंबळा उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी कार्यक्रमाची पाहणी करून पाण्याची मागणी नोंदवायची आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तिथी ठेवण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर कुठल्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. उपविभागाला अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाला किंवा नाही याची खात्रीही शेतकऱ्यांनी करावयाची आहे. पाणी घेण्यासाठी उपविभागाकडूनच शेतकऱ्यांना पासेस दिल्या जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत पाणीपट्टी थकबाकीच्या रकमेचा भरणा केला नाही, असे शेतकरी सिंचनासाठी पाणी घेण्यास पात्र ठरणार नाही. त्यामुळे या थकबाकीचा भरणा करावा असे बेंबळा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता दे.जो. राठोड यांनी सांगितले.