गुराख्यासाठी म्हशीची बिबट्यावर झेप

By Admin | Updated: November 10, 2015 03:05 IST2015-11-10T03:05:15+5:302015-11-10T03:05:15+5:30

जनावर ज्याच्या संगतीत राहते, त्याच्यावरच जीव लावते. जीवच लावत नाही, तर प्रसंगी त्याच्यासाठी जीवही देते.

Leap on a buffalo for the cattle | गुराख्यासाठी म्हशीची बिबट्यावर झेप

गुराख्यासाठी म्हशीची बिबट्यावर झेप

दिवाळीतले अनोखे नाते : माणसांत गुंतला जनावरांचा जीव
सुदाम दारव्हणकर रूंझा
जनावर ज्याच्या संगतीत राहते, त्याच्यावरच जीव लावते. जीवच लावत नाही, तर प्रसंगी त्याच्यासाठी जीवही देते. बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या एका गुराख्यासाठी त्याच्याच कळपातल्या म्हशींनी चक्क बिबट्यावर झेप घेतली. म्हशीचा चवताळलेला अवतार पाहून बिबट्याने धूम ठोकली अन् गुराख्याचा जीव वाचला. ऐन दिवाळीत पांढरकवडा तालुक्यातील गोवारी हेटी जंगलात ही घटना सोमवारी घडली.
रूंझा येथून जवळच असलेल्या मोहदा येथील येथील जयवंत वामनराव घाटोळ (२५) हा गुराखी म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी जयवंत जनावरांचा कळप घेऊन गोवारी हेटीच्या जंगलात पोहोचला. गाई-म्हशी चरत होत्या. सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका बिबट्याने गुराख्यावर झेप घेतली. त्याच्या पुढे बिबट्या नव्हता, साक्षात मृत्यूच उभा होता. वाचवायला कुणीच नव्हते. बिबट्याने हल्ला केलाच. जयवंत लोळला. त्याच्या पोटावर, छातीवर, मानेवर ओरखडे गेले. जयवंत जिवाच्या आकांताने ओरडला. वाचवा... ऐकायला कोण होते? त्याचाच मुका कळप! त्या कळपाला गुराख्याचे काळीज कळले. कळपातील म्हशी चवताळल्या. बिबट्यावर चाल करून गेल्या. गुराख्याच्या अंगावर झेपावलेल्या बिबट्याला आपल्या मस्तकाचा तडाखा दिला. क्षणभर बिबट्यालाही काही कळले नाही. सावरत त्याने धूम ठोकली ती कायमची.
विशेष म्हणजे रविवारी याच बिबट्याने या कळपातील एका गाईवर हल्ला केला होता. पण तेवढ्यात एक म्हैस चवताळून बिबट्यावरच धावून गेली. तिच्या रूद्रावताराने इतर जनावारांचीही भीड चेपली. अख्खा कळपच चवताळलेला पाहून बिबट्याने धूम ठोकली. गाय बचावली. जयवंतला हायसे वाटले. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्रसंग ओढवला. यावेळी मुक्या जीवांनी त्याचा प्राण वाचविला. त्याच्यावर रुंझाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
दोन दिवसानंतर येणाऱ्या गायगोधनाच्या दिवशी हाच गुराखी आपल्या याच गुरांना सजवून दिवाळी साजरी करणार होता. तो आताही करणारच. पण या घटनेनंतर त्याच्या गायगोधनात घट्ट नात्याचा सुगंध जरूर येणार आहे.

Web Title: Leap on a buffalo for the cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.