पुढाऱ्यांनी अचानक बदलले रंग

By Admin | Updated: October 29, 2015 02:57 IST2015-10-29T02:57:04+5:302015-10-29T02:57:04+5:30

मारेगाव आणि झरी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे पुढाऱ्यांचे बदलते रंग जनतेसमोर येत आहे. कालचे मित्र आज वैरी,...

The leaders suddenly changed colors | पुढाऱ्यांनी अचानक बदलले रंग

पुढाऱ्यांनी अचानक बदलले रंग

नगरपंचायत निवडणूक : कालचे मित्र झाले वैरी, झरी-मारेगाव येथे प्रचिती
वणी : मारेगाव आणि झरी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे पुढाऱ्यांचे बदलते रंग जनतेसमोर येत आहे. कालचे मित्र आज वैरी, तर कालचे वैरी आज मित्र झाल्याचे या निवडणुकीवरून दिसून येत आहे. सामान्य मतदारांना मात्र पुढाऱ्यांच्या या बदलत्या रंगामुळे चांगलेच बुचकाळ्यात टाकले आहे.
गेल्या आॅक्टोबर २0१४ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे उमेदवार एकमेकांविरूद्ध दंड थोपटून उभे होते. या निवडणुकीत मोदी लाटेमुळे अनपेक्षितपणे भाजपा उमेदवाराने बाजी मारली. काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले. विधानसभा निवडणुकीनंतर चार-पाच महिन्यांपूर्वी येथील वसंत सहकारी संस्थेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत विधानसभेत एकमेकांविरूद्ध लढणारे पुढारी मात्र अचानकपणे एकत्र झाले होते. क्षणात त्यांनी रंग बदलले.
‘वसंत’च्या निवडणुकीत काँग्रेसविरूद्ध भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोट बांधली होती. विधानसभेत एकमेकांविरूद्ध लढणारे पुढारी या निवडणुकीत एकवटले होते. त्यांनी काँग्रेसविरूद्ध पॅनल उभे केले. काँग्रेसने एकाकी लढत देत ‘वसंत’वरील आपले वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीत मनसेने मात्र आपला बाणेदारपणा कायम राखला होता. त्यांनी कुणाशीही हातमिळवणी न करता स्वतंत्रप्रणे पॅनल लढविले होते. त्यांच्या पॅनेलने पराभवास सामोरे जाणे योग्य मानले, मात्र विधानसभेतील प्रतिस्पर्ध्यांशी हातमिळवणी करण्याचे टाळले होते.
‘वसंत’च्या निवडणुकीनंतर महिनाभरापूर्वीच इंदिरा सहकारी सुत गिरणीची निवडणूक झाली. या निवडणुकीतही काँग्रेसविरूद्ध भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने पॅनल उभे केले. या पॅनलला ११ विरूद्ध १0 असे निसटते बहुमतही मिळाले. त्यामुळे हुरळून गेलेल्या काँग्रेस विरोधकांना चांगलेच स्फुरण चढले. सुत गिरणी आता आपल्या ताब्यात आली, या तोऱ्यातच ते वागू लागले होते. तथापि पदाधिकारी निवडीच्या वेळी काँग्रेसने त्यांच्या स्वप्नांचा पार चुराडा करून टाकला. विद्यमान आमदारांना अध्यक्षपदापासून दूर लोटत काँग्रेसने त्यांच्याच गोटातील संचालक ओढून सुत गिरणीवरील वर्चस्व कायम राखले.
‘वसंत’ आणि ‘इंदिरा’वर सत्ता स्थापन करण्याचे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यानंतर, आता झरी आणि मारेगाव नगरपंचायतीची निवडणूक आली.
या निवडणुकीने पुन्हा एकदा विधानसभेत परस्परांविरूद्ध उभे ठाकलेल्या पुढाऱ्यांचे रंग बदलल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंत मनसे वगळता काँग्रेसविरूद्ध एकवटलेले विरोधक मारेगाव येथे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. तेथे काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे स्वतंत्रपणे लढत आहे. एकप्रकारे तेथे विधानसभेची पुनरावृत्ती होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The leaders suddenly changed colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.