विरोधी पक्ष नेते शेताच्या बांधावर
By Admin | Updated: December 2, 2014 23:12 IST2014-12-02T23:12:45+5:302014-12-02T23:12:45+5:30
विदर्भात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते आमदार एकनाथ शिंदे मंगळवारी नेर तालुक्यातील शेतांच्या बांधावर पोहोचले. लोणी, टाकळी, कोलुरा

विरोधी पक्ष नेते शेताच्या बांधावर
दुष्काळाची पाहणी : शेतकऱ्यांनी मांडले वास्तव
नेर : विदर्भात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते आमदार एकनाथ शिंदे मंगळवारी नेर तालुक्यातील शेतांच्या बांधावर पोहोचले. लोणी, टाकळी, कोलुरा येथील शेतातील दुष्काळाचे वास्तव अनुभवत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. विदर्भ दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आणि कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यासंदर्भात शिवसेना पाठपुरावा करेल, असे सांगितले.
विरोधी पक्ष नेते आमदार शिंदे दुपारी १२ वाजता तालुक्यातील लोणी येथील प्रफुल्ल भास्कर कावरे यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी शेतातील सुकलेले तुरीचे झाड आणि सोयाबीनचे वास्तव अनुभवले. तेव्हा कावरे यांनी आपल्याला चार एकरात दोन पोते सोयाबीन झाल्याचे सांगितले. तसेच वन्यप्राण्यांनी फस्त केलेल्या तुरीची माहिती कृषी विभागाला दिली. परंतु उपयोग झाला नसल्याचे सांगितले. त्यानंतर मोहन बाबूलाल आडे यांच्याशी संवाद साधला. दरम्यान विरोधी पक्ष नेते वाहनातून उतरताच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घातला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक का नाही, असा सवाल केला. यावेळी आमदार शिंदे यांनी शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊन शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला एकरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी केल्याचे सांगितले. तसेच विदर्भातील दुष्काळाचे वास्तव विधानसभेत मांडणार असल्याचे सांगितले. नेर येथील परमानंद अग्रवाल यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार संजय राठोड यांनीही शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा उहापोह केला. (तालुका प्रतिनिधी)