एलसीबीकडे ७१ गुन्ह्यांचा तपास
By Admin | Updated: June 22, 2014 00:11 IST2014-06-22T00:11:51+5:302014-06-22T00:11:51+5:30
स्थानिक गुन्हे शाखेकडे सध्या तब्बल ७१ गुन्ह्यांचे तपास गोळा झाले आहे. पुरेसे अधिकारी उपलब्ध असूनही या गुन्ह्यांचा तपास पाहिजे त्या वेगाने पुढे सरकताना दिसत नाही.

एलसीबीकडे ७१ गुन्ह्यांचा तपास
यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेकडे सध्या तब्बल ७१ गुन्ह्यांचे तपास गोळा झाले आहे. पुरेसे अधिकारी उपलब्ध असूनही या गुन्ह्यांचा तपास पाहिजे त्या वेगाने पुढे सरकताना दिसत नाही.
स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबी ही जिल्हा पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा ओळखली जाते. पोलीस ठाण्यांच्या आवाक्याबाहेरील गुन्ह्यांचा तपास या शाखेकडे सोपविला जातो. कधी अन्यायग्रस्त तपासासाठी या शाखेची मागणी करतात. तर कधी पोलीस ठाण्याच्या यंत्रणेवर अविश्वास दाखवून, अकार्यक्षमतेचा ठपका ठेऊन पोलीस अधीक्षक प्रकरणाचा तपास या शाखेकडे सोपवितात. अशा माध्यमातून आतापर्यंत तब्बल ७१ गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पाटीपुरा येथील एका तरुणीच्या तीन महिन्यांपासून बेपत्ता प्रकरणाचा तपासही महिला संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर एलसीबीला सोपविला गेला. त्यात मनदेव घाटातील खून, रामायण हॉटेलमधील कथित आत्महत्या, दादू मिश्रा अशा काही मोठ्या प्रकरणांचा समावेश आहे. प्रल्हाद गिरी यांची बदली झाल्यापासून एलसीबी प्रमुखाचे पद रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. एलसीबी अंतर्गत अनेक पथके कार्यरत आहे. त्यात चार सहायक निरीक्षक आणि दोन फौजदार असे सहा अधिकारी आहे. दोनच दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेला पोलीस निरीक्षक बच्छाव यांची नियुक्ती करण्यात आली.
उपलब्ध अधिकाऱ्यांची संख्या पाहता ७० गुन्ह्यांचा तपास वेगाने करणे कठीण नाही. मात्र ते एलसीबीच्या अधिनस्त असले तरी त्यांच्याकडे वेगवेगळी स्वतंत्र जबाबदारी दिली गेली आहे. पर्यायाने महत्वाच्या आणि आव्हानात्मक गुन्ह्यांचे तपास रखडले आहे. एलसीबी अंतर्गत सेवा देणारे काही अधिकारी दारू-जुगारावरील धाडीतच ‘धन्यता’ मानत असल्यानेही तपास मोठ्या प्रमाणात रखडल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)