ले-आऊटधारकाने पाच कोटींनी फसविले
By Admin | Updated: December 7, 2014 22:57 IST2014-12-07T22:57:59+5:302014-12-07T22:57:59+5:30
येथील भोसा रोडवर गजानन नगरी भाग एक, दोन, तीन या नावाने ले-आऊट पाडून तब्बल ८१ प्लॉट खरेदीदारांनी पाच कोटी ३४ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार वडगाव रोड ठाण्यात दाखल केली आहे.

ले-आऊटधारकाने पाच कोटींनी फसविले
यवतमाळ : येथील भोसा रोडवर गजानन नगरी भाग एक, दोन, तीन या नावाने ले-आऊट पाडून तब्बल ८१ प्लॉट खरेदीदारांनी पाच कोटी ३४ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार वडगाव रोड ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणात सतीश नरहरशेट्टीवार आणि त्यांचा प्रतिनिधी श्रीकांत खोडे यांच्या नावाने ही तक्रार देण्यात आली आहे.
फेब्रुवारी २०१२ मध्ये ८१ नागरिकांनी प्लॉट खरेदी करण्यासाठी १५ महिने नियमित हप्ते भरले. मात्र ठराविक कालावधी पूर्ण होऊनही ले-आऊटधारकांकडून प्लॉट खरेदी करून देण्यात आले नाही. यासाठी सातत्याने तगादा लावूनही सतीश नरहरशेट्टीवार यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. या प्रकरणात तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला मात्र प्लॉटच्या आशेने ज्यांनी नियमित हप्ते भरले अशा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. शेवटी या प्रकरणात फसवणूक होत असल्याचे आढळून येताच त्यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच ले-आऊट धारकाविरोधात अकोला येथेसुद्धा २८ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रार दाखल झाली आहे. गजानन नगरीतील खरेदीदारांच्या समस्येबाबत सतीश नरहरशेट्टीवार याने १० वेळा मिटिंग बोलाविली मात्र तो सातत्याने गैरहजर राहिला आहे.
सदर शेताचे अकृषक झालेले नाही. प्लॉट पाडण्यात आलेली जमीन नरहरशेट्टीवार यांच्या नावे नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सुनील प्रकाश खोले, सुधाकर मांडवगडे, कमल वाणी, लक्ष्मी बोगाडे, ज्योती गोल्हर, शिल्पा गुळघाणे, मिथून पवार, कांताबाई मनवर, प्रकाश चमेडिया, योगेश गुल्हाने, दत्तात्रेय कांबळे, परमेश्वर धांदे यांच्यासह ८१ जणांनी तक्रार दिली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)