अमोलकचंद विधी महाविद्यालयात ‘लॉ फेस्ट’
By Admin | Updated: March 26, 2017 01:18 IST2017-03-26T01:18:30+5:302017-03-26T01:18:30+5:30
येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात वार्षिक महोत्सव ‘उडाण’ उत्साहात पार पडला.

अमोलकचंद विधी महाविद्यालयात ‘लॉ फेस्ट’
‘उडाण’ : वार्षिक महोत्सव उत्साहात, कामगार, औद्योगिक कायद्यांवर मार्गदर्शन
यवतमाळ : येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात वार्षिक महोत्सव ‘उडाण’ उत्साहात पार पडला. यानिमित्त क्रीडा, संगीत, शैक्षणिक उपक्रम, मूट कोर्ट, वक्तृत्व आदी स्पर्धा घेण्यात आल्या. औद्योगिक न्यायालयाचे न्या. जी.जी. हुलसुरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव पी.डी. चोपडा अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. विजेश मुणोत, लॉ फेस्टचे प्रभारी प्रा. संदीप नगराळे आदी मंचावर उपस्थित होते.
कामगार आणि मालक यांच्या हिताचे कायदे असले तरी अनेक ठिकाणी कामगारांना न्याय मिळत नाही. अशाप्रसंगी कायद्याच्या विद्यार्थ्यांनी स्वस्थ न बसता जनहिताची कामे करावी, असे आवाहन न्या. हुलसुरे यांनी केले. देशातील कामगार व औद्योगिक परिस्थिती आणि कामगार व औद्योगिक कायदे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कामगार क्षेत्रात वकिली करण्याची चांगली संधी उपलब्ध असल्याचे सांगून त्यांनी पुढे चालून न्यायिक अधिकारी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश चोपडा म्हणाले, डिमोनिटायझेशन झाल्यामुळे लोकांना करंसीचा अधिकार कळला. कायद्याचे विद्यार्थी म्हणून अशा बाबींचा वैधानिक अभ्यास करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशातील निवडणुकांचे बदलते स्वरूप यावरही कायद्याच्या विद्यार्थ्यांनी चिकित्सक अभ्यास करण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र धात्रक यांच्या हस्ते आणि अॅड. प्रवीण हर्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. संचालन काजल मेहता, काजल बत्रा यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. अमिता मुंदडा, प्रा. योगिता बोरा, डॉ. नितीन कोथळे, अॅड. मीनाक्षी काळे, अॅड. सोनल भोयर, अॅड. अंजली दिवाकर, अॅड. रवींद्र सोनटक्के, प्रा. सुचिता ढेरे, प्रा. विजय गुर्जर, अॅड. योगेश लिंगावार, अॅड. विजया घाडगे, अॅड. नियती हिंडोचा आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)