शिव प्रकाश योजनेचा शुभारंभ
By Admin | Updated: June 23, 2015 00:33 IST2015-06-23T00:33:30+5:302015-06-23T00:33:30+5:30
शहरालगतच्या उकंडा पोड येथे शिव प्रकाश योजना आणि वर्ग १ ते ४ वर्गाच्या शाळेचा शुभारंभ...

शिव प्रकाश योजनेचा शुभारंभ
उकंडापोड : वर्ग एक ते चारची शाळा सुरू, रावते यांचे मार्गदर्शन
यवतमाळ : शहरालगतच्या उकंडा पोड येथे शिव प्रकाश योजना आणि वर्ग १ ते ४ वर्गाच्या शाळेचा शुभारंभ सोमवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय राठोड, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हा परिषद सदस्य मंदा गाडेकर आदी उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी शासन विविध योजना राबवित आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांना शिकवून त्यांना पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, असे ना.रावते यावेळी म्हणाले. आदिवासी समाजातील युवकांना एसटी महामंडळात नियुक्ती मिळावी म्हणून चार नवीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना चालक म्हणून थेट नोकरी मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील युवकांनी हे प्रशिक्षण घ्यावे, असे ते म्हणाले. शासन जलक्रांती योजनेंतर्गत जिल्ह्यात श्रमदानातून ५० मोठे बंधारे बांधणार आहे. शिव प्रकाश योजनेच्या माध्यमातून पोड, वाड्यांमध्ये वीज उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री संजय राठोड यांनी उकंडा पोड येथे सामाजिक कार्य आणि जनसेवेच्या भावनेतून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शिव प्रकाश योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पोड, गावांमध्ये वीज उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)