वनविभागाच्या वनौषधी विक्री केंद्राचे लोकार्पण
By Admin | Updated: April 1, 2017 00:39 IST2017-04-01T00:39:15+5:302017-04-01T00:39:15+5:30
वन समित्यांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने वनधन जनधन योजना सुरू केली आहे.

वनविभागाच्या वनौषधी विक्री केंद्राचे लोकार्पण
वनसमित्यांना रोजगार : उमर्डा नर्सरीत प्रक्रिया प्लान्ट, चांदणी चौकातील कार्यालयात उद्घाटन
यवतमाळ : वन समित्यांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने वनधन जनधन योजना सुरू केली आहे. वनसमितीने गोळा केलेली औषधी आणि इतर वनउपज विक्रीसाठी आता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात केंद्र उघडण्यात आले आहे. यवतमाळातील चांदणी चौक स्थित कार्यालयातील केंद्राचे उद्घाटन मंगळवारी दुपारी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्यात संपन्न असे जंगल आहे. या जंगलात विविध अशा वनौषधी उपलब्ध आहेत. याशिवाय इतरही अमूल्य असे वनउपज या जंगलातून मिळते. मात्र त्यावर योग्य प्रक्रिया आणि ब्रॅन्डींग होत असल्याने बाजारपेठेत त्याची मागणी नाही. प्राथमिक स्थरावर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनौषधी विक्री केंद्र उघडण्यात आले. यासाठी यवतमाळातील उमर्डा येथील वन समितीने पुढाकार घेतला आहे. उमर्डा येथील नर्सरी परिसरात वनौषधी व वन उपजावर प्रक्रिया करण्यासाठी प्लान्ट बसविण्यात आला आहे. येथे विविध प्रजातीच्या औषधीयुक्त बिया, मूळ यापासून चूर्ण तयार केले जाते. जंगलातील मध, फळ व बियांपासून काढलेले तेल येथे विक्रीसाठी ठेवले आहे. लोकर्पणप्रसंगी मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण, उपवनसंरक्षक व्ही.एन. हिंगे, सहाय्यक वनसंरक्षक गिरजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी, संजय माघाडे, चेटुले उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)