मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन
By Admin | Updated: December 30, 2016 00:13 IST2016-12-30T00:13:16+5:302016-12-30T00:13:16+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळंब शहरात प्रथमच शासकीय कार्यक्रमाला गुरुवारी हजेरी लावली.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन
‘कॅशलेस’चे आकर्षण : कळंबमधील विविध स्टॉलने वेधले नागरिकांचे लक्ष
कळंब : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळंब शहरात प्रथमच शासकीय कार्यक्रमाला गुरुवारी हजेरी लावली. कार्यक्रमस्थळी शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल लावले होते. या ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. मुख्यमंत्र्यांनी स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होताच त्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी सरळ स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. सर्वप्रथम जलयुक्त शिवार योजनेची माहिती घेतली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत किती कामे करण्यात आली. त्या कामांचा सकारात्मक झालेला परिणाम याची माहिती या स्टॉलवर होती. कृषी विभागाच्या माध्यमातून मशरुम, पपई, सिताफळ, लिंबू या पिकांची माहीती देण्यात आली.
बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी काय योजना आहे, बळीराजा चेतना अभियानातून किती लोकांना मदत करण्यात आली, याची माहितीही स्टॉलवर उपलब्ध होती. बोरीमहलच्या बचत गटाने शेळी व्यवस्थापन व पशुखाद्य भांडे याची माहिती दिली. राळेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून वनहक्क कायद्याची संपूर्ण माहिती देण्यात आली. सेंट्रल बँकेकडून डिजीटल बँकीगंची माहिती उपलब्ध होती. कॅशलेस व्यवहार कसा करावा, याची माहिती घेताना नागरिकांमध्ये उत्सुकता व आकर्षण दिसत होते. कळंब व राळेगाव तहसील कार्यालयाच्या माध्यमातून महसुलच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री समाधान शिबीरासाठी राबविण्यात आलेल्या विविध लाभांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच सेतु केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदांची माहिती विषद करण्यात आली. आधार नोंदणी कक्षात लोकांचे आधारकार्ड काढण्यात आले. पोलीस विभागाकडून सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली. प्रकल्प कार्यालय पांढरकवडाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती व पत्रके देण्यात आली. विद्युत वितरण कंपनीकडूनही योजनांची माहिती देण्यात आली.
वृक्षांचे महत्व, त्यांची निगा व काळजी, झाडांची ओळख, पशुधन हानी, मनुष्य हानी, पीकांचे नुकसान व त्यासाठी होणारी मदत याची माहिती देण्यात आली. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कडबाकुटी यंत्र, जनावरांसाठी पूरक खाद्य तसेच विविध जातीचे गवत याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह व इतर अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)